
पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेपैकी बहुतांश जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. सध्या उपलब्ध जागांवरील अडथळे काढून सेवा वाहिन्यांची कामे महापालिकेने सुरू केली आहेत. ही कामे पूर्ण होऊन एक महिन्यात रस्ता रुंदीकरण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे मेट्रो, उड्डाणपुलाच्या कामाला वेग येण्याबरोबरच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंद ऋषीजी महाराज चौक व गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विद्यापीठासमोरील चौकात उड्डाणपूल, समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) बांधले जाणार आहेत. गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी या रस्त्यावरील २३ खासगी मालमत्तांसह राज्य आणि केंद्र सरकारच्या मालमत्ता रुंदीकरणासाठी मिळणे आवश्यक होते. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पथ विभागाकडून जागा मालक, संस्थांशी सातत्याने संवाद साधल्यानंतर खासगी जागा मालकांनी रुंदीकरणासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या संस्थांच्या जागांबाबत अडचण येत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर शासकीय तंत्रनिकेतन, महावितरण कार्यालय, कर्मचारी वसाहत यांच्या जागेचा प्रश्न मिटला. आता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी), रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) व एक पेट्रोल पंपाच्या जागेचा प्रश्न कायम आहे.
दोन टप्प्यांमध्ये रुंदीकरणाचे काम
महापालिकेच्या पथ विभागाकडून विद्यापीठ चौक ते रिझर्व्ह बॅंक या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पहिल्या टप्प्यात १० जागांवरील अडथळे हटविण्यात आले आहेत. तेथे आता जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटारांचे स्थलांतर आणि सेवा वाहिन्यांसाठी डक्टचे काम सुरू केले आहे. १५ दिवसांत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. तर दुसऱ्या टप्प्यातील काम १५ ते २० दिवसांत पूर्ण करून रस्ता रुंदीकरण पूर्ण केले जाणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी नऊ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
रुंदीकरणाची वैशिष्ट्ये
- ३६ मीटर असलेला गणेशखिंड रस्ता रुंदीकरणानंतर होणार ४५ मीटर
- उड्डाणपूल उतरणाऱ्या ठिकाणी सेवा रस्ता होणार उपलब्ध
- रुंदीकरणासाठी आवश्यक २३ जागांपैकी २० जागा महापालिकेच्या ताब्यात
- भूसंपादन झालेल्या ठिकाणी अडथळे काढण्याचे काम सुरू
गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी ९० टक्के जागा मिळाली असून उर्वरित जागाही लवकरच मिळेल. उपलब्ध झालेल्या जागेवरील अडथळे काढून सेवा वाहिन्यांचे काम सुरू केले आहे. एक महिन्यात रस्ता रुंदीकरण होईल. त्यानंतर उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळेल.
- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका