Pune : 'या' दोन विभागांमुळे महापालिकेला यंदा 100 कोटींपेक्षा अधिक महसूल

PMC
PMCTendernama
Published on

पुणे (Pune) : महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा समजल्या जाणाऱ्या बांधकाम विभागाने २ हजार ६०० कोटी रुपये, तर मिळकतकर विभागाने २ हजार ३५५ कोटी रुपये इतक्‍या महसुलाची महापालिकेच्या तिजोरीत भर घातली. मिळकतकर विभागाला अंदाजपत्रकानुसार उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठता आले नसले, तरीही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १०० कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे.

PMC
Pune : डांबर घोटाळा प्रकरणी महापालिका कारवाई करणार का?

महापालिकेच्या मिळकतकर, बांधकाम विभागासह विविध विभागांकडून महसूलवाढीला प्राधान्य देण्यात आले होते. मिळकतकर विभागाकडून अधिकाधिक मिळकतकर जमा होण्यासाठी विशेष पथके, महिलांची पथके, बॅंड पथके अशी विविध पथके तयार केली होती. विशेषतः शेवटच्या टप्प्यात तांत्रिक अडचणी असलेल्या अनेक प्रकरणांवर निर्णय घेत नागरिकांना मिळकतकर भरण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते. दरम्यान, मागील वर्षाप्रमाणे यंदाही सलग सुट्या आल्याने नागरिकांची गडबड होण्याची शक्‍यता होती. मात्र महापालिकेने २८ ते ३१ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या कालावधीत ग्राहक सुविधा केंद्रे सुरू ठेवली होती. याबरोबरच कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत त्याला तांत्रिक अडचण येऊ नये, याची खबरदारी विभागाने घेतली होती.

PMC
Mumbai : 50 वर्षे मुंबईची पाण्याची चिंता मिटली; ‘त्या’ दोन्ही प्रकल्पातील अडथळे दूर

मात्र, अंदाजपत्रकानुसारचे २ हजार ७०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट विभागाला गाठता आलेले नाही. राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाविष्ट गावांतील थकबाकीदारांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याने उत्पन्न कमी झाल्याचा दावा मिळकतकर विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

बांधकाम विभागाला २६०० कोटी रुपये

बांधकाम विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३ हजार ३५९ बांधकामांना परवानगी दिली. त्यातून बांधकाम विभागाने २ हजार ४९२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पार करत २ हजार ६०१ कोटी ८८ लाख रुपयांचा महसूल मिळविला. मागील वर्षीदेखील बांधकाम विभागाने महसुलाचे उद्दिष्ट पार करत २ हजार ४०७ कोटी रुपये इतका महसूल प्राप्त केला होता.

पुण्यातील राहणीमानाचा दर्जा सुधारत आहे. त्यामुळे शहरात निवासी आणि व्यापारी संकुलांमध्ये वाढ झाली आहे. बांधकाम परवानगीची यंत्रणा सुटसुटीत असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढत आहे.

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

असा मिळाला मिळकतकर

- ३१ मार्च २०२४ - २२ कोटी ९२ लाख ६० हजार ४४७

- ३१ मार्च २०२५ - ३१ कोटी ८९ लाख ८५ हजार ३२६ (सायंकाळी ६ पर्यंत)

पूर्ण वर्षात जमा झालेला मिळकतकर

१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ - २ हजार २४९ कोटी ९९ लाख ८६ हजार ६०७

२०२४ ते २०२५ - २ हजार ३५५ कोटी ९ लाख ४ हजार ३३९ (सायंकाळी ६ पर्यंत)

बांधकाम विभाग कर

आर्थिक वर्ष-ठेवण्यात आलेले उद्दिष्ट (कोटी)-प्रत्यक्ष उत्पन्न (कोटी)

- २०१९-२०- ८९९ कोटी ६७ लाख-७६९ कोटी ६३ लाख

- २०२०-२१-९९९ कोटी ३३ लाख-५०७ कोटी ६३ लाख

- २०२१-२२-१ हजार १८५ कोटी ६ लाख-२ हजार ९५ कोटी ९ लाख

- २०२२-२३-१ हजार ४०० कोटी १५ लाख-१ हजार ६३५ कोटी ९४ लाख

- २०२३-२४-१ हजार ६०४ कोटी ८४ लाख-२ हजार ४०७ कोटी २६लाख

- २०२४-२५-२ हजार ४९२ कोटी ८४ लाख-२ हजार ६०१ कोटी ८८ लाख

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com