
पुणे (Pune) : शहरातील १५ रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम महापालिकेने ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण केले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या रस्त्यांच्या कामानंतर आणखी १७ रस्ते चांगले करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या रस्त्यांवर डांबरीकरणासह वाहतूक चिन्हांचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
गणेशखिंड रस्त्याच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रपती भवनाने नाराजी व्यक्त करणारे पत्र महापालिकेला पाठविले होते. त्यानंतर प्रशासनाने तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सुरु केलेल्या ‘आदर्श रस्ते’ संकल्पनेनुसार रस्ते करण्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, काही दिवसांपासून शहरातील १५ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून, संबंधित रस्ते खरवडून काढत तेथे डांबरीकरण करण्यात आले. याबरोबरच रस्त्यांमधील चेंबरची झाकणे दुरुस्त करून त्यामध्ये एकसलगता आणली. जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांसह सेवा वाहिन्यांची कामे करून रस्ते चांगले केले आहेत.
१७ रस्त्यांवर होणार ही कामे
१) इंडियन रोड कॉंग्रेसच्या नियमांप्रमाणे डांबरीकरण
२) वाहतूक नियमांचे चिन्ह
३) झेब्रा पट्टे
४) दृष्टिहीन नागरिकांसाठी मार्गदर्शक चिन्हे
५) पदपथ, पथदिवे
६) वृक्षारोपण
शहरातील ३२ रस्त्यांच्या डांबरीकरणासह सर्व कामे पूर्ण करून नागरीकांना चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून केला जाणार आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथविभाग, महापालिका
पूर्णत्वास आलेले आदर्श रस्ते
नगर रस्ता, सोलापुर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ- व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नॉर्थ मेन रस्ता- कोरेगाव पार्क, गणेशखिंड रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्ता.
डांबरीकरण होणार असलेले १७ रस्ते - किलोमीटर
१) जुना मुंबई-पुणे महामार्ग - ५.४०
२) बंडगार्डन रस्ता - ५.९०
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता - ४.०५
४) जुना विमानतळ रस्ता - ४.६०
५) सिंहगड रस्ता - १२.४८
६) खराडी बाह्यवळण - ६.९०
७) पुणे-सासवड रस्ता - १३.७०
८) टिळक रस्ता - १.९०
९) जंगली महाराज रस्ता - २.००
१०) फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता - २.५७
११) सेनापती बापट रस्ता - ६.३०
१२) सुस-पाषाण रस्ता - ६.३०
१३) कात्रज - मंतरवाडी रस्ता - १५.६०
१४) आळंदी रस्ता - ६.०६
१५) नेहरू रस्ता - ९.५०
१६) साधू वासवानी रस्ता - १.२६
१७) महात्मा गांधी रस्ता - १.७५