.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : शहराच्या प्रवेशद्वारासह पुणे स्टेशन परिसरात मॉल, मल्टीप्लेक्सप्रमाणे नागरिकांना चांगले व स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध व्हावीत यासाठी वातानुकूलित (एसी) स्वच्छतागृह महापालिका उभारणार आहे. या प्रत्येक स्वच्छतागृहासाठी महापालिका तब्बल ४ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. मात्र, हे स्वच्छतागृह उभारल्यानंतर ते दुर्गंधीयुक्त आणि स्वच्छ ठेवण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागात महापालिकेची सुमारे १२०० स्वच्छतागृह आहेत. त्यात विद्युत व्यवस्था नसणे, तुटलेली भांडी, फरशा, तुंबलेली मोरी, तुटलेले नळ, फुटलेली पाइपलाइन यामुळे ही स्वच्छतागृह दुरावस्था झालेली असते. या दयनीय अवस्थेमुळे ही सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याचे नागरिक टाळतात. शहरातील स्वच्छतागृहे, शौचालये घाण होत असल्याने महापालिकेने पाच कोटी रुपये खर्च करून स्वच्छतेसाठी पाच परिमंडळात पाच निविदा काढल्या आहेत. त्यामध्ये जेटींग मशिनने पाणी मारून प्रत्येक स्वच्छतागृह दिवसातून दोन वेळा स्वच्छ करणे आवश्यक आहे. पण या ठेकेदारांकडून तीन चार दिवसातून एक स्वच्छतागृह स्वच्छ केले जात आहे. तसेच ते पूर्ण स्वच्छ न करता केवळ पाण्याचा मारा करून कर्मचारी निघून जातात. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करूनही बहुतांशी स्वच्छतागृह वापरण्याच्या लायकिचे नाहीत. दुर्गंधीमुळे त्या परिसरातून ये-जा करताना नागरीकांना अक्षरशः नाका-तोंडावर रुमाल ठेवण्याची वेळ येते.
शहरात महिलांच्या स्वच्छतागृहांची कमतरता असताना त्यांच्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने महिलांची कुचंबणा होते. डिसेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे उभारली पाहिजेत, तेथे चांगल्या सुविधा असाव्यात अशी सूचना केली होती. त्यानंतर महापालिकेने शहराच्या प्रवेशद्वारावर व्हीआयपी स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार त्याचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले आहे.
या सुविधा असणार
व्हीआयपी स्वच्छतागृहात आंबोळीची, कपडे बदलण्याची सुविधा असले. मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा आणि वायफाय देखील असणार आहे. हे स्वच्छतागृह पूर्णपणे वातानुकूलित असून, मॉल, मल्टिप्लेक्समध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने सुसज्ज स्वच्छतागृह असतात त्याच पद्धतीचे स्वच्छतागृह महापालिका उभे करणार आहे. हे स्वच्छतागृह पूर्णपणे सशुल्क असणार आहेत. या स्वच्छतागृहाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी या ठिकाणी जाहिरात करण्याचा हक्का स्वच्छतागृहाच्या ठेकेदाराला देण्यात येणार आहे.
या ठिकाणी असणार स्वच्छतागृह आणि खर्च
- कात्रज चौक, सातारा रस्ता - ८६.११ लाख
- पुणे-मुंबई रस्ता, बालेवाडी, - ८६.२५ लाख
- शेवाळवाडी बस डेपो, पुणे सोलापूर रस्ता -८६.३५ लाख
- पुणे रेल्वे स्टेशन- ८६.०८ लाख
- वाघोली, पुणे नगर रस्ता - ८६.४० लाख
‘‘शहराच्या प्रवेशद्वाराजवळ व पुणे स्टेशन येथे सुसज्ज व अद्ययावत स्वच्छतागृहे बांधली जाणार आहे. ही स्मार्ट स्वच्छतागृहे वातानुकूलित असणार आहेत. यासाठी ४ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका