
पिंपरी (Pimpri): मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांनी मोबाईल ॲप, व्हॉटस्ॲप, किऑस्क अशा डिजिटल माध्यमांना पसंती दिल्याचे दिसते. यावरून पुणे मेट्रोचा प्रवास कागदविरहित तिकीटाकडे सुरू असल्याचे दिसून येते.
महा मेट्रोने केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला चालना देण्यास पूरक कार्यप्रणालीचा अवलंब केला आहे. यास प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे. दररोजच्या धावपळीच्या जीवनात तिकीट रांगेत थांबून तिकीट काढण्यापेक्षा प्रवासीही डिजिटल तिकिटाला पसंती देत आहे.
नागरिकांचा कल दिवसेंदिवस डिजिटल व्यवहारांकडे वाढत आहे. याचे चित्र पुणे मेट्रोमध्ये उमटत आहे. डिजिटल व्यवहारांची संख्या तब्बल ७३.७५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पेपर तिकीट काढलेल्या प्रवाशांचे प्रमाण केवळ २६.२५ टक्के इतकेच होते.
सर्वच ठिकाणी ऑनलाइन व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. शॉपिंग मॉल, फूड कोर्ट, विमानतळ आणि रेल्वे स्थानके अशा सर्वच ठिकाणी ऑनलाइन पेमेन्टची सुविधा दिली जाते.
पुणे मेट्रो प्रशासनाने डिजिटल तिकिटासाठी वेगवेगळी माध्यमे उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये मोबाईल ॲप, व्हॉटस्ॲप, महामेट्रो कार्डद्वारे आणि स्थानकावरील तिकीट मशिनच्या माध्यमातून ऑनलाइन तिकीट काढता येत आहे. याशिवाय स्थानकावर जाऊन ऑनलाइन किंवा रोख पैसे देऊन ऑफलाइन कागदी तिकीट काढण्याचीही सोय आहे.
मेट्रोला वाढती पसंती
४ कोटी ४५ लाख ३३ हजार ८८ ः एकूण प्रवासी
२.२५ लाख ः दैनंदिन संख्या सरासरी
७३.७५ ः ऑनलाइन तिकिटे घेतलेले प्रवासी
२.५३ टक्के ः किऑस्क
०.५० टक्के ः तिकीट व्हेंडिंग मशिन
६४.१० टक्के ः व्हॉट्सॲप
३२.८७ टक्के ः मोबाईल ॲप
२६.२५ टक्के ः पेपररुपी तिकिटे घेतलेले प्रवासी
(पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील जानेवारी ते १० सप्टेंबर दरम्यानची आकडेवारी)
दृष्टिक्षेपात
२ कोटी ८२ लाख ७१ हजार ७१ ः एकूण तिकिटे
१ कोटी ५ लाख ९६ हजार ९८२ ः ऑनलाइन तिकिटे
१ कोटी २ लाख ५० हजार २९८ ः कांऊटरवरील तिकिटे
७४ लाख २३ हजार ७९१ ः पेपर तिकिटे
ऑनलाइन माध्यमे - तिकिटांची संख्या
किऑस्क - २,६७,२७५
तिकीट व्हेडिंग मशिन - ५२,८२५
व्हॉट्सॲप - ६७,९३,०३५
मोबाईल ॲप - ३४,८३,८४७
पुणेकरांनी डिजिटल व्यवहारांना पसंती दिली आहे. पुणे मेट्रो डिजिटल व्यवहारांमध्ये देशात प्रथम स्थानावर असून ही पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यात १०० टक्के प्रवाशांनी डिजिटल तिकीटांचा वापर करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो