Pune : पुणेकरांसाठी मेट्रोने दिली गुड न्यूज! आता तुळशीबाग, दगडूशेठ गणपती मंदिराकडे जाण्यासाठी...
पुणे (Pune) : मेट्रो प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी मंडई स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक तीन सोमवारपासून (ता. ९) खुले करण्यात आले.
त्यामुळे तुळशीबाग, दगडूशेठ गणपती मंदिर , शनिपार, बाबूगेनू गणपती अशा महत्त्वाच्या व गजबजलेल्या धार्मिक तसेच पर्यटन स्थळी पोचणे सोपे होईल. त्यामुळे हजारो नागरिकांची सोय होईल.
मंडई स्थानक मध्य वस्तीत आहे. गजबजलेल्या पेठांमधील नागरिकांसाठी हे प्रवेशद्वार अतिशय उपयुक्त ठरणार आहे. महात्मा फुले मंडईजवळील टिळक पुतळ्याजवळ हे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे भाजीबाजारात येणाऱ्यांचीही सोय होईल.
दरम्यान, रामवाडी व कासारवाडी या मेट्रो स्थानकांवरील प्रवेशद्वारांवरील सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रामवाडी स्थानकाच्या प्रवेशद्वार क्रमांक दोन आणि कासारवाडी स्थानकाच्या प्रवेशद्वार क्रमांक तीन येथे ही सुविधा आहे. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि जड सामान नेणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे.
प्रवाशांना उत्तम आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही मेट्रो प्रशासनाने आवर्जून नमूद केले आहे.