
पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकावरून मेट्रोने प्रवास करणाऱ्या व मेट्रोतून रेल्वे स्थानकावर दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी पादचारी पूल अथवा अन्य ठिकाणी तिकीट काउन्टर सुरू करण्यात येणार आहे.
असे काउन्टर सुरू झाल्यास दोन्ही प्रकारच्या प्रवाशांची सोय होईल. रेल्वे प्रशासन तेथे जनरल व फलाट तिकीट विक्री सुरू करेल. मेट्रोच्या वनाज ते रूबी हॉल क्लिनिक मार्गावरील पुणे रेल्वे स्थानक एक महत्त्वाचे स्थानक असून, तेथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होते.
मेट्रो स्थानकातून अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यासाठी पादचारी पुलावरून स्थानकावर दाखल होतात. त्यांना स्थानकाच्या आवारात विना तिकीट दाखल व्हावे लागते. अशा प्रवाशांसाठी पादचारी पुलाजवळ अथवा पुलावर तिकीट विक्री केंद्र सुरू केल्यास सोय होईल. याच वेळी मेट्रोचे तिकीट अथवा क्यूआर कोडचे फलक लावण्याचा देखील मेट्रोचा विचार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे आणि मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा सुरू आहे. लवकरच आम्ही एकत्रित जागेची पाहणी करणार आहोत. त्यानंतर तिकीट काऊन्टरसाठी स्थळ निश्चित केले जाईल.
- डॉ. रामदास भिसे ,जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग