
पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) सुरू केलेल्या ‘रंगयात्रा’ ॲपवरून सांस्कृतिक केंद्र आणि नाट्यगृहांचे आरक्षण करण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील १४ सांस्कृतिक केंद्रे आणि नाट्यगृहांचे आरक्षण ॲपवरून घरबसल्या करता येणार आहे. सर्व नाट्यगृहांची तपशीलवार माहितीही ॲपवर पाहता येणार आहे.
यापूर्वी आरक्षण ऑफलाइन पद्धतीने होत असे. त्यामुळे एखादे नाट्यगृह आरक्षित करायचे असल्यास प्रत्यक्ष तेथे जाऊन अर्ज करावा लागायचा. ही गैरसोय टाळण्यासाठी आणि सर्व प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महापालिकेने ‘रंगयात्रा’ ॲपची सुविधा उपलब्ध केली आहे.
ॲप ‘अँड्रॉइड’ आणि ‘आयओएस’ अशा दोन्ही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाईलवर उपलब्ध असून, मराठी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय आहे.
कोणीही ॲप डाउनलोड करून नाट्यगृहाच्या सत्राचे आरक्षण करू शकते. त्यापूर्वी नाव, संपर्क क्रमांक, ओळखपत्र आदी बाबींची नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीनंतर शहरातील सर्व नाट्यगृहांचे तपशील पाहता येतील.
त्यात नाट्यगृहाची आसनक्षमता, विविध कार्यक्रमांसाठी असणारे भाडे, त्याचे उद्घाटन कधी झाले, छायाचित्रे आदींची माहिती दिली आहे. नाट्यगृहातील अधिकच्या साहित्याच्या अथवा सुविधांच्या वापराचे भाडेही नमूद केले आहे.
ज्या नाट्यगृहासाठी अर्ज करायचा आहे, त्याचा पर्याय निवडून कार्यक्रम नियोजित असलेल्या दिवसातील सत्र निवडल्यानंतर ते सत्र आरक्षणासाठी उपलब्ध आहे किंवा नाही, हे कळते. सत्र उपलब्ध असल्यास आगाऊ रक्कम भरून आरक्षित करता येईल.
सर्व अर्ज प्राप्त झाल्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या नियमाप्रमाणे सत्रांचे वाटप केले जाईल. त्याची माहिती ई-मेलद्वारे अर्जदारांना कळवली जाणार आहे. नाट्यगृहांच्या सत्रांचे वाटप चौमाही पद्धतीने होत असल्याने एक मे ते ३१ ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीसाठीचे अर्ज २५ मार्चपर्यंत मागविले आहेत.
...असे होणार सत्रांचे वाटप
यापूर्वी ऑफलाइन पद्धतीत ज्या पद्धतीने सत्रांचे वाटप होत असे, त्याच पद्धतीने ऑनलाइन पद्धतीतही केले जाणार आहे. एका सत्रासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास नाटकांना प्राधान्य दिले जाईल. नाटक नसल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाईल.
नाट्यगृहांचे आरक्षण यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने व्हायचे, ते आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. वाटपाच्या प्रक्रियेत मात्र कोणताही बदल केलेला नाही. नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा उपलब्ध केली असून, आता सर्व व्यवहारही ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे कार्यक्रम संयोजक आणि महापालिकेचेही काम सुलभ होणार आहे.
- सुनील बल्लाळ, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, महापालिका