
मुंबई (Mumbai) : पनवेल हे मुंबईच्या वेशीवरील वेगाने विकसित होत असलेले महानगर आहे. या महानगरातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता, येथे भव्य बसपोर्ट होणे काळाची गरज आहे. २०१८ पासून रखडलेले बसपोर्ट प्रकल्प लवकर सुरू करण्यात यावे याकरिता रिटेंडर प्रसिध्द करावे, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले.
विधानभवन येथे राज्यातील राज्य परिवहन विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी आमदार विक्रांत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार विजय देशमुख, आमदार दौलत दरोडा, एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, मुख्य लेखाधिकारी तथा आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख उपस्थित होते. २०१८ पासून रखडलेल्या पनवेल बसस्थानकासंदर्भात स्थानिक आमदार विक्रांत पाटील यांनीही हे काम तात्काळ करावे अशी मागणी केली. तसेच नांदेड येथील सांगवी येथे मागील अनेक वर्षापासून बसस्थानक उभारावे ही मागणी लक्षात घेता स्थानिक प्रशासनाला तातडीने यावर कार्यवाही करण्याचे निर्देश परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी दिले. यावेळी नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी याबाबत प्रशासनाकडून प्राधान्याने या कामाला गती द्यावी अशी मागणी केली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील नवीन बस पोर्टचे काम गतीने करणे, सोलापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम गतीने करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती शेड उभारण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. यासंदर्भात वाढते शहरीकरण आणि शालेय विद्यार्थ्यी तसेच स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी काळानुरूप बसपोर्ट उभारण्यावर राज्य परिवहन विभागाने प्राधान्य द्यावे अशी मागणी शहापूरचे आमदार दौलत दरोडा व सोलापूरचे आमदार विजय देशमुख यांनी केली.
सूरत बसपोर्टच्या धर्तीवर होणार पनवेल डेपोचा विकास -
मुंबई विभागातील मध्यवर्ती बस स्थानक म्हणून ओळख असलेल्या पनवेल एसटी आगाराच्या विकासकामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. सुरतच्या बसपोर्टच्या धर्तीवर याठिकाणी बांधकाम प्रस्तावित आहे. सुमारे २३५ कोटींचे हे टेंडर असणार आहे. मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पनवेलमधील बस आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून एसटी गाड्या ये-जा करीत असतात. त्यातून दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक होते. याशिवाय नोकरी-धंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक या बसस्थानकातून प्रवास करतात. मुंबई विभागातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या या स्थानकातून कोकणाकडे जाणाऱ्या बसच्या दररोज हजारो फेऱ्या होत आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्पामुळे पनवेलचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रेल्वेचे टर्मिनन्स पनवेल येथे होणार आहे. येथील नागरीकरण वाढीचा वेग पाहून एसटी आगाराच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. २०१८-१९ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शहरातील १७ हजार ५०० चौरस मीटर भूखंडावर असणाऱ्या पनवेल एसटी स्थानकाच्या जागेवर अद्ययावत बसस्थानक उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. सध्या पनवेल एसटी स्थानकाकडे ८.५० एफएसआय भूखंड उपलब्ध आहे. या भूखंडापैकी ५० टक्के एफएसआयवर बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. स्थानकाच्या उर्वरित जागेवर एसटी कार्यालय व व्यावसायिक बांधकाम करण्यात येईल. त्याचबरोबर पार्किंग, अत्याधुनिक स्वरूपाचे फलाट, वर कार्यालय, विश्रामगृह, कॉन्फरन्स हॉल, स्वच्छतागृह याशिवाय इतर सर्व सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर येथे मॉल आणि इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात येणार आहे.