
पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणाला महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नामुळे वेग मिळाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील सेवा वाहिन्या व सीमाभिंत बांधण्याचे काम सुरू आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी तत्काळ रस्त्याचे कामही सुरू केले आहे. आत्तापर्यंत रुंदीकरणाचे काम ६० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे.
गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंद ऋषीजी महाराज चौकासह गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) बांधणार आहे. गणेशखिंड रस्ता सध्या ३६ मीटर रुंद आहे, मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर तो आणखी अरुंद होणार असल्याने रुंदीकरणाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.
रूंदीकरणानंतर हा रस्ता ४५ मीटरचा होणार आहे. रुंदीकरणासाठी खासगी मालमत्तांसह राज्य व केंद्र सरकारच्या संस्थांच्या जागा महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. आता रिझर्व्ह बॅंक व महावितरण कंपनीच्या ताब्यातील जागा महापालिकेस मिळणे बाकी आहे. या जागा उपलब्ध झाल्यास रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
महिनाअखेरीस रुंदीकरण पूर्ण होणार
महापालिकेने ऑक्टोबर अखेरपर्यंत गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, जागा ताब्यात घेणे, सीमाभिंत बांधणे, सेवा वाहिन्यांचे जाळे टाकणे या कामांना महापालिका प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील काही मालमत्ता वगळता उपलब्ध जागेमध्ये सीमाभिंत बांधण्याचे काम पूर्ण केले आहे.
कॉसमॉस बॅंक ते काकडे मॉलपर्यंत तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही काही प्रमाणात सीमाभिंत बांधण्याचे काम झाले आहे. याबरोबरच जलवाहिनी, पावसाळी गटारे, सांडपाणी वाहिन्या, केबल अशा सेवा वाहिन्यांची कामेही करण्यात आली आहेत. सेवा वाहिन्या व सीमाभिंतीची कामे झालेल्या ठिकाणी रस्ता तयार करण्यास सुरूवात केली आहे. पेट्रोल पंपाजवळ व अन्य काम पूर्ण झालेल्या ठिकाणी रस्ता तयार केला जात आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील सेवा वाहिन्यांची कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी सेवा वाहिन्या, सीमाभिंत बांधून पूर्ण झाली आहे. तेथे रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
- जनार्दन दांडगे, अधिक्षक, पथ विभाग, महापालिका