
पुणे (Pune) : पुणे शहरातील पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकासाचा वेग वाढत असून, त्यामुळे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच ही परिस्थिती रिअल इस्टेट क्षेत्रासाठीही फायद्याची ठरणार असल्याचे दिसतून येत आहे.
गेल्या पाच वर्षांत पुण्याची आयटी निर्यात तब्बल दुप्पट वाढून १.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून, पुणे आता देशातील तिसरे सर्वांत मोठे सॉफ्टवेअर निर्यात केंद्र ठरले आहे. येथील आयटी आणि उत्पादन क्षेत्रे मिळून शहराच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी इंजिनसारखी गती देत आहेत. यामुळे रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि रिअल इस्टेट क्षेत्रालाही चालना मिळाली आहे, असा निष्कर्ष ‘जेएलएल’च्या अहवालात नोंदविण्यात आला आहे.
सध्या पुण्यात ३६० पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर कार्यरत आहेत. यात बँकिंग व वित्तीय सेवा (३० टक्के), उत्पादन (२६ टक्के) आणि तंत्रज्ञान (२१ टक्के) या क्षेत्रांचा मोठा वाटा असून, संशोधन व नावीन्यपूर्ण कार्यासाठी सततची मागणी निर्माण होत आहे. एकूण ‘जीडीपी’त पुणे शहराचा ८.३ टक्के वाटा आहे. गेल्या दशकात पुण्यातील लोकसंख्येत तब्बल ३३ टक्के वाढ झाली आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा तीनपट वाढ झाल्याने रोजगारनिर्मितीही वाढली आहे.
कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेत पुण्याचा देशातील वाटा नऊ ते दहा टक्के आहे. २०२८ पर्यंत येथे सुमारे २२.३ कोटी चौरस फूट ग्रेड-ए कार्यालयीन जागा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
उत्पादन क्षेत्रातही पुण्याने झपाट्याने प्रगती केली असून, हजारो नवे औद्योगिक प्रकल्प सुरू झाले आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या नोंदणीतही पुणे राज्यात आघाडीवर असून, लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे.
निवासी बाजारात किफायतशीर घरांबरोबरच प्रीमियम गृहनिर्माण प्रकल्पांचा वेगाने विस्तार होत आहे. तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये डेटा सेंटर महत्त्वाचे ठरत असून, सध्या ११९ मेगावॅट क्षमतेची नऊ केंद्रे कार्यरत आहेत.
रिंगरोड, मेट्रो विस्तार, नदीकाठचा रस्ता आणि नवी मुंबई विमानतळाची जवळीक यामुळे पुण्याच्या आर्थिक वृद्धीला नवे पंख मिळतील. औद्योगिक, आयटी, निवासी, किरकोळ आणि पायाभूत सुविधा या सर्वच क्षेत्रांच्या संतुलित प्रगतीमुळे पुणे हे भारताच्या संतुलित शहरी विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून समोर येत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.