
पुणे (Pune) : क्रीडा विभागाने व्यायामशाळा आणि क्रीडा साहित्यासाठी टेंडर मागवल्या आहेत. या दोन्हीही टेंडर विशिष्ट कंपन्या डोळ्यांसमोर ठेवून अटी घालण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे.
संबंधित दोन्ही टेंडर रद्द करण्याची मागणी माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
माने म्हणाले की, या क्षेत्रातील तसेच, या कामाचा अनुभव असणाऱ्या कंपन्यांना स्पर्धेबाहेर काढण्यात आले. अशा धोरणांमुळे हे कर्मचारी बेरोजगार होतील. सरकारला या क्षेत्रातील अनुभवी कंपन्यांची मुस्कटदाबी करायची आहे.
टेंडरमधील अटीनुसार महाराष्ट्रातील या क्षेत्रातील कुठल्याही कंपन्या पात्र ठरू शकणार नाहीत. ज्या कंपन्यांच्या दृष्टीने अटी घालण्यात आल्या, त्यांचे क्रीडा आणि व्यायाम साहित्याचे उत्पादन युनिट आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, अशीही त्यांनी या वेळी मागणी केली.