पुणे (Pune) : तांत्रिक कारणामुळे दीड वर्ष बंद पडलेली महापालिकेची ‘एव्हिएशन गॅलरी’ पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एव्हिएशन गॅलरी सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे शहरातील लहान मुलांना लवकरच पुन्हा एकदा जगभरातील विमान क्षेत्राशी संबंधित इत्थंभूत माहिती, विमानांचे मॉडेल्स पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेने शिवाजीनगर गावठाण परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून ‘सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी’ उभारली होती. मार्च २०२० मध्ये एव्हिएशन गॅलरीचे उद्घाटन झाले. कोरोनापासून ही गॅलरी बंद ठेवण्यात आली. मागील दीड वर्षांपासून एव्हिएशन गॅलरी अक्षरशः धुळखात पडून होती. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत एव्हिएशन गॅलरी पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
विशेषतः महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गॅलरी सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. दरम्यान, संबंधित एव्हिएशन गॅलरी पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला.
एव्हिएशन गॅलरी चालविण्यासाठी आवश्यक विमान क्षेत्राशी संबंधित संस्था पुढे येत नसल्याने एव्हिएशन गॅलरीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता एव्हिएशन गॅलरी चालविणे व त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठीची टेंडर प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. टेंडर प्रक्रिया सहा नोव्हेंबरला सुरू झाली असून १७ नोव्हेंबरला टेंडर खुल्या केल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर महापालिकेकडून पुढील प्रक्रिया केली जाईल.
एव्हिएशन गॅलरीची वैशिष्ट्ये
- शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना विमानांबद्दलची माहिती मिळावी.
- प्रदर्शन, प्रत्यक्ष विमान, हेलिकॉप्टरचे मॉडेल्स, ड्रोन, एरोमॉडलिंग, पॅरामोटरिंग पाहण्याची संधी.
- लहान मुलांमध्ये विमान, अंतराळ विज्ञान क्षेत्रासंबंधी उत्सुकता निर्माण करणे.
एव्हिएशन गॅलरी चालविण्यासाठीची एव्हिएशन गॅलरी चालविण्यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर ही गॅलरी सुरू करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल.
- चेतना केरूरे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, पुणे महापालिका