
पुणे (Pune) : पुणे शहरात अनेक ठिकाणी बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. याशिवाय उड्डाणपूल, मेट्रो, रस्त्यांच्या कामांमुळे शहर धुळीने माखले आहे. त्याचा वाहनचालकांना व स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. धुळीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून बांधकाम व्यावसायिक व ठेकेदारांकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे आता पुणे महापालिका संबंधितांना नोटिसा बजावून उपाययोजना करण्याचे आदेश देणार आहे.
या संदर्भात महापालिका आयुक्त अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहरात कोथरूड, बाणेर, बालेवाडी, वारजे माळवाडी, कर्वेनगर, धायरी, नऱ्हे, कात्रज, आंबेगाव, हडपसर, कोंढवा, मुंढवा, खराडी, धानोरी, येरवडा, विश्रांतवाडी, बोपोडी तसेच मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत.
सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, गणेशखिंड यांसह अन्य भागांत उड्डाणपूल, रस्ते, मेट्रोची कामे सुरू आहेत. यामुळे धूळ उडून हवेची गुणवत्ता घसरल्याने अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे.
हवेची गुणवत्ता ढासळत असलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे. शहरात डंपरमधून खडी, माती, मुरूम, सिमेंट यांची वाहतूक होत असल्याने धुळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी माल वाहतूक करताना धूळ उडणार नाही, यासाठी संबंधितांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
बांधकामाला परवानगी देताना त्याबाबत व्यावसायिकांनाही सूचना दिलेल्या असतात. पण संबंधितांकडून बांधकामाच्या ठिकाणी पत्रे लावणे, हिरवे कापड लावून धूळ रोखणे, पाण्याचा मारा करून धुळीचे प्रमाण कमी करणे, अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे, पण याकडे दुर्लक्ष होत असल्याने धुळीचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खराब होत आहे.
बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ कमी करण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली जाणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील.
- डॉ. राजेंद्र भोसले, पुणे महापालिका आयुक्त