Pune : पुणेकरांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय, पण पालिकेचा विरोध का?

Metro Neo
Metro NeoTendernama

पुणे (Pune) : उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) महामेट्रोने (MahaMetro) निओ मेट्रो (Neo Metro) प्रकल्पाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (DPR) वर्षभरापूर्वी महापालिकेला सादर केला. मात्र, अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, मेट्रो मार्गाला छेदून निओ मेट्रो जाणार असल्याने महापालिकेने हरकत घेतली आहे. त्यात बदल करावेत, असे मेट्रोला सुचविले आहे. त्यामुळे अजूनही प्रस्ताव चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकला आहे.

Metro Neo
Narendra Modi : गोंदियातील आमगाव रेल्वे स्टेशन कात टाकणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या...

शहरात मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण होत असताना ‘एचसीएमटीआर’ मार्गावर निओ मेट्रो करावी असा पर्याय समोर आला. राज्य शासनाच्या आदेशानुसार महामेट्रोने ‘एचसीएमटीआर’चे आरक्षण असलेल्या रस्त्यावर ४३.८४ किलोमीटर लांबीची निओ मेट्रो प्रस्तावित केली आहे. त्याचा खर्च चार हजार ९४० कोटी रुपये आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निओ मेट्रोच्या प्रस्तावाचे सादरीकरण झाले. पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या मार्गाचा अभ्यास केला. त्यात मेट्रो आणि वर्तुळाकार निओ मेट्रो एकमेकांना आठ ते नऊ ठिकाणी छेद देत आहे. त्याचप्रमाणे गणेशखिंड रस्त्यावर ‘पीएमआरडीए’ मेट्रोच्या पुलावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून येणारी निओ मेट्रो ही सेनापती बापट रस्त्यावर किमान ३० मीटर इतक्या उंचीवरून जाणार आहे.

कर्वे रस्त्यावरून म्हात्रे पूल डीपी रस्त्यापर्यंत मेट्रो नाल्यातून दाखवली आहे. म्हात्रे पूल, सेनादत्त पोलिस चौकी, साने गुरुजी वसाहत, सणस मैदान हा मार्ग अतिशय अरुंद रस्त्यावरून आहे. तसेच शहराच्या इतर भागातही अरुंद रस्त्यावरून निओ मेट्रो धावणार आहे. परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या मार्गात बदल करावा अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

Metro Neo
Eknath Khadse : कंत्राटदारांना देयके का मिळत नाहीत? एकनाथ खडसेंचा सरकारला सवाल

तंत्रज्ञानाबाबत साशंकता...
निओ मेट्रो म्हणजे रबरी चाकांवर व विजेवर धावणारी मेट्रो. बसच्या तुलनेत चार ते पाच पट प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असून, ताशी ९० किलोमीटर वेगाने धावू शकते. अशी मेट्रो देशातील कोणत्याही शहरातून धावत नसल्याने हे तंत्रज्ञान यशस्वी होईल की नाही? याबाबत साशंकता आहे. यासंदर्भात ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा’च्या (पुम्टा) बैठकीतही चर्चा झाली.

तसेच महापालिकेने ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पासाठी पाच हजार १९२ कोटींची किंमत निश्चित करून टेंडर काढले होते. यामध्ये २४ मीटर रुंदीच्या रस्त्यावर चार लेन खासगी वाहतुकीसाठी, तर दोन लेन सार्वजनिक वाहतुकीसाठी होत्या. मात्र, ठेकेदारांनी टेंडर भरताना ४५ टक्के म्हणजे सात हजार ५२५ कोटी रुपये जादा दराने टेंडर भरली. हा खर्च महापालिकेला परवडणारा नसल्याने टेंडर रद्द केली. त्यानंतर ‘एचसीएमटीआर’ मार्गावर निओ मेट्रोची चर्चा सुरू झाली.

Metro Neo
Uday Samant : ठाणे मेट्रोचे काम MMRDAला देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा

अरुंद रस्ते आणि दाट लोकवस्तीमधून निओ मेट्रो नेणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे या मार्गात बदल करण्यासाठी सांगितले आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

महापालिका आणि महामेट्रो यांच्यात निओ मेट्रोच्या ‘डीपीआर’संदर्भात अनेक बैठका झाल्या. त्यांच्याकडून ज्या सुधारणा सांगितल्या जात आहेत, त्या आम्ही करत आहोत. हा प्रस्ताव सध्या महापालिकेकडेच विचाराधीन आहे.
- हेमंत सोनवणे, महासंचालक, जनसंपर्क विभाग, महामेट्रो

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com