गोंदिया (Gondia) : गोंदिया जिल्ह्यातील (Gondia District) आमगाव रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेत (Amrut Bharat Railway Station) समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रेल्वे स्टेशनवर अनेक सोईसुविधा निर्माण करून स्टेशनला विकसित केले जाणार आहे. खासदार अशोक नेते यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. अमृत भारत योजनेनुसार रेल्वे स्टेशनमध्ये केल्या जाणाऱ्या कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते येत्या 6 ऑगस्टला व्हर्च्युअल पद्धतीने केले जाणार आहे.
गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील जारी वडसा तसेच हावडा मुंबई मार्गावरील आमगाव या स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या स्टेशनवर नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी खासदार नेते यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे नव्या बजेटनुसार आलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेत वडसा, आमगाव सोबत चांदाफोर्ट या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा समावेश करून या स्थानकांवर नागरिकांसाठी नवीन आधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमृत भारत योजनेत भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासोबत मास्टर प्लॅन तयार करून त्यानुसार स्टेशनचे रूप बदलविले जाईल.
'या' सुधारणावर दिला जाणार भर
आयताकृती क्षेत्र, वेटिंग हॉल, स्वच्छ टॉयलेट, लिफ्ट/एस्कलेटर, मोफत वाय-फाय अशा विविध बाबींचा त्यात समावेश होतो. स्थानकावर एक स्टेशन एक उत्पादन, उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, कार्यकारी समुपदेशक, व्यावसायिक बैठकीसाठी नियुक्त ठिकाणे, लँडस्केपिंग आदींवर भर दिला जाणार आहे.
6 ऑगस्टला व्हर्च्युअल उद्घाटन
येत्या 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 506 रेल्वे स्थानकांसाठी अमृत भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या कामांचा शुभारंभ आभासी पद्धतीने (ऑनलाईन) करणार आहेत. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा आभासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत.
बऱ्याच कालावधीनंतर प्रश्न मार्गी
हावडा-मुंबई मार्गावरील आमगाव रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. या स्थानकावरून लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील प्रवाशी देखील प्रवास करतात. तर हे शहर मध्यभागी असल्याने व्यापारी दृष्टीकोनातून सुद्धा त्याला महत्त्व आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून आमगाव रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. आता अमृत योजनेत या स्थानकाचा समावेश झाल्याने प्रश्न मार्गी लागला आहे.