
पुणे (Pune) : अहमदाबाद विमान दुर्घटनेची जखम ताजी असतानाच शुक्रवारी (ता. २०) पुणे विमानतळावर (Pune Airport) उतरणारे विमान अपघातातून थोडक्यात बचावले.
दिल्लीहून पुण्याला येणारे एअर इंडियाच्या (एआय-२४६९) विमानाच्या उजव्या इंजिनला पक्ष्याची जोरदार धडक झाली. यात विमानाच्या इंजिनमधील ब्लेडचे पर्यायाने उजव्या इंजिनचे मोठे नुकसान झाले. मात्र वैमानिकाने शिताफीने सुरक्षितपणे विमानाचे लँडिंग केल्याने प्रवाशांचे प्राण बचावले.
विमान नादुरुस्त झाल्याने पुढची सेवा रद्द झाली. सुदैवाने विमानाचा अपघात न झाल्याने सर्व प्रवासी पुणे विमानतळावर सुखरूप उतरले. ही घटना पुणे विमानतळावर सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली.
पुणे विमानतळाच्या हवाई क्षेत्रात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा वावर वाढला आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाचे ए-३२० या विमानाला पुण्यात धावपट्टीवर उतरत असताना पक्ष्याची धडक झाली.
पक्षी विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये धडकल्याने तांत्रिक बाधा निर्माण झाली. वैमानिकाने सुरक्षितपणे विमानाचे लँडिंग केले. सर्व प्रवासी सुखरूप उतरले.
१२ जूनला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघाताला पक्ष्यांची धडक कारणीभूत असल्याची शक्यता काही हवाई वाहतूकतज्ज्ञांनी वर्तवली आहे. अशातच पुणे विमानतळावरदेखील पक्षाच्या धडकेची घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.
इंजिनचे नुकसान; सेवा रद्द
- पक्ष्याची धडक झाल्याने वैमानिकाने ही बाब संबंधित कंपनीच्या तांत्रिक पथकाला दिली.
- पथकाने इंजिन दोनची पाहणी केली असता त्यात ब्लेडचे नुकसान झाल्याचे आढळून आले.
- परिणामी पुण्याहून दिल्लीला सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी जाणारे (एआय२४७०) विमान रद्द करण्यात आले.
- प्रवासी वाहतुकीला अडथळा ठरू नये, म्हणून हे विमान ‘रिमोट बे’वर (बाजूला करून) ठेवण्यात आले.
- इंजिनची दुरुस्ती झाल्यानंतरच विमानाचे उड्डाण होईल
४० प्रवाशांना विमानातून उतरविले
- दिल्लीहून पुण्याला आलेले विमान सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पुन्हा दिल्लीला जाणार होते.
- त्यामुळे पुण्याहून ४० प्रवासी या विमानाने दिल्लीला जाण्यासाठी विमानात बसले.
- मात्र इंजिन तपासणीत ब्लेडचे नुकसान झाल्याचे आढळले अन् विमान रद्द झाले.
- या प्रवाशांना एआय -८७४ या विमानात बसविण्याचा निर्णय झाल्याने त्यांना आधीच्या विमानातून उतरविण्यात आले.
- एआय -८७४ विमानात प्रवासी बसल्यानंतर या विमानाची तपासणी केली, त्यातदेखील बिघाड आढळून आल्याने तेही रद्द करण्यात आले.
- एकाच वेळी पुणे विमानतळावर एअर इंडियाच्या दोन्ही विमानांत बिघाड आढळून आल्याने त्यांना बाजूला ठेवण्यात आले.
पुणे विमानतळाची धावपट्टी ही हवाईदलाच्या नियंत्रणाखाली आहे. पुणे विमानतळावर पक्ष्यांचा वावर वाढला आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. असे प्रकार रोखण्यासाठी हवाई दल व विमानतळ प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र ते तोकडे पडत आहेत. पक्षी येऊ नयेत यासाठी आणखी वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ