पिंपरी (Pimpri) : राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी, माण, मारूंजी परिसरातील पायाभूत सुविधांच्या संदर्भाने येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिलेल्या पत्रात ही मागणी केली आहे.
खासदार सुळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी परिसरातील जागतिक दर्जाच्या ‘राजीव गांधी आयटी पार्क’ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित जगभरातील अग्रगण्य कंपन्या आहेत.
देशातील महत्त्वाच्या आयटी पार्कमध्ये याचा समावेश होतो. येथील पायाभूत सुविधांची जबाबदारी घेणारी कोणतीही निश्चित अशी यंत्रणा नाही. त्यामुळे अनेकदा एमआयडीसी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महावितरण, मेट्रो, पोलिस अशा विविध आस्थापनांकडे यासंदर्भातील तक्रारी द्याव्या लागतात. त्या एकमेकांशी संबंधित असल्याने त्या सोडविणे तुलनेने अधिक जटिल झाल्या आहेत.
सध्या रस्ते, वीज, पाणी याबाबत अनेक अडचणी येत आहेत. वाहतूक समस्या, आयटी कर्मचारी, नागरिक यांची असुरक्षितता या समस्याही भेडसावत आहेत.
हे प्रश्न सोडविण्यासाठी विविध आस्थापनांकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ‘राजीव गांधी आयटी पार्क’चे जागतिक व्यापार नकाशावरील स्थान लक्षात घेतले तर येथे अशा पद्धतीच्या अडचणी निर्माण होणे खेदजनक आहे, असे खासदार सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.