
पुणे (Pune) : मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत औंधच्या जैवविविधता उद्यानातील (बॉटेनिकल गार्डन) ३० गुंठे जागा वगळण्याची शिफारस महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिवांना केली आहे. त्यानुसार विभागाने शासन आदेश काढल्यानंतर ३० गुंठे जागा महापालिकेला मिळणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते, त्यास अखेर यश मिळाल्याने प्रकल्पाच्या कामाला गती येणार आहे.
मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत (जायका प्रकल्प) एक हजार ४७२ कोटी रुपये खर्च करून ३९६ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.
मुळा-मुठा नदीत येणारे सांडपाणी शुद्ध करून पुन्हा नदीत सोडण्यासाठी ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) प्रस्तावित आहेत. त्यापैकी एक १० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प औंधमधील जैवविविधता उद्यानात प्रस्तावित आहे; पण ही जागा उद्यानाच्या आरक्षणाअंतर्गत येत असल्याने कृषी विभागाने देण्यास नकार दिला आहे. त्यावर महापालिका आणि शासन स्तरावर बैठका झाल्या. मात्र, त्यावर तोडगा निघाला नव्हता.
दरम्यान, नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने ही जागा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महापालिकेला हस्तांतर करण्यास काही हरकत नसल्याची भूमिका घेतली होती. परंतु, त्याबाबत शिफारस केलेली नव्हती.
सर्व प्रकारच्या तांत्रिक तपासणीनंतर ३० गुंठे जागा महापालिकेला हस्तांतर करण्याची शिफारस केली आहे, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनीही अटी-शर्ती टाकून जागा महापालिकेला देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ३० गुंठे जागा जैवविविधता वारसास्थळाच्या क्षेत्रातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर येथील जैवविविधता मंडळाने औंधमधील ३० गुंठे जागा सांडपाणी प्रकल्पासाठी देण्याची शिफारस महसूल व वनखात्याकडे केली आहे. या विभागाकडून शासन आदेश काढल्यानंतर ही जागा महापालिकेला मिळेल.
- जगदीश खानोरे, अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका