pmrda
pmrdaTendernama

PMRDA : अनधिकृतपणे प्लॉटवर बांधकाम करणारे रडारवर; खेड तालुक्यात...

Published on

पिंपरी (Pimpri) : अनधिकृतपणे प्‍लॉटवर बांधकाम करणारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या (पीएमआरडीए) रडारवर आले आहेत. खेड तालुक्‍यातील २८ प्‍लॉटधारकांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एप्रिलमध्ये ही कारवाई केली जाईल, अशी माहिती ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने दिली आहे.

pmrda
Pune : डांबर घोटाळा प्रकरणी महापालिका कारवाई करणार का?

पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामावरील कारवाईची गती वाढवली आहे. गेल्‍या महिन्‍यात पीएमआरडीए हद्दीतील महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविण्यात आला होता. कारवाईचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील कारवाईत २६ मार्चपर्यंत सव्वाचार हजार अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. तिसऱ्या टप्यांत पुणे - सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे), हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट, नवलाख उंब्रे ते चाकण, हिंजवडी परिसर - माण या रस्त्यासह महामार्गांवर कारवाई प्रगतिपथावर आहे. यात १७ ते २६ मार्चपर्यंत ७५० अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.

pmrda
Mumbai : 50 वर्षे मुंबईची पाण्याची चिंता मिटली; ‘त्या’ दोन्ही प्रकल्पातील अडथळे दूर

या कारवाईबरोबरच आता खेड तालुक्‍यातील अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएने लक्ष केंद्रित केले आहे. २८ प्‍लॉटवरील बांधकामे अनधिकृत आढळली आहेत. विविध परिसरात ही स्‍थिती असून त्‍यावर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये बांधकामे निष्कासित करणे, वाढीव बांधकामे पाडणे आदी कारवाई होणार आहे. सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. पोलिसांकडे बंदोबस्‍ताची मागणी केली आहे. बंदोबस्‍त मिळाल्‍यानंतर या कारवाईला सुरवात होणार आहे. त्‍यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना हा धसका असणार आहे.

महिन्‍यात सुमारे ८० तक्रारी

पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकाम आढळल्‍यास त्‍याची तक्रार नागरिकांनी देण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. नागरिकांच्‍या तक्रारीनंतर पीएमआरडीए प्रशासन कारवाई करत आहे. महिन्‍याकाठी पीएमआरडीएकडे सुमारे ८० तक्रारी प्राप्‍त होत आहेत, अशी माहिती अनधिकृत बांधकाम विभागाच्‍यावतीने देण्यात आली.

‘‘खेड तालुक्‍यातील अनधिकृत २८ प्‍लॉटवर आम्‍ही कारवाई करणार आहे. त्‍यासाठी पोलिस बंदोबस्‍ताची मागणी केली आहे. तो मिळाल्‍यास या कारवाईला सुरवात होईल.

- दीप्‍ती सूर्यवंशी, सहआयुक्‍त, अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभाग.

Tendernama
www.tendernama.com