.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या धर्तीवर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) (PMRDA) हद्दीतील मुळा आणि मुठा नदी सुधार योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्राधिकरणाच्या हद्दीतील मुळा नदीच्या ३३ किलोमीटर, तर मुठा नदीच्या २१ किलोमीटर अशा ५४ किलोमीटर लांबीच्या नद्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘नमामि गंगे’ अंतर्गत पुणे महापालिकेने शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी नदी सुधार कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कामालादेखील सुरुवात झाली आहे. त्याच धर्तीवर ‘पीएमआरडीए’ने हद्दीतील या दोन्ही नद्यांच्या सुधार कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी निविदा मागवून सल्लागाराची नेमणूक करण्याची प्रक्रिया प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात
- मुळा नदीची एकूण लांबी ही ४४ किलोमीटर
- त्यापैकी ३३ किलोमीटर लांबीची नदी प्राधिकरणाच्या हद्दीतून जाते
- मुठा नदीची लांबी ३६ किलोमीटर
- त्यापैकी २१ किलोमीटर लांबीची नदी प्राधिकरणाच्या हद्दीतून जाते
- त्यासाठी सुमारे ९७७ कोटी रुपये खर्च अपेक्षित
- खर्चापैकी केंद्र सरकारकडून साठ टक्के अनुदान स्वरूपात, तर चाळीस टक्के ‘पीएमआरडीए’ असा वाटा असणार
- सल्लागार कंपनीकडून अहवाल तयार झाल्यानंतर तो मान्यतेसाठी राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार
प्रकल्पामध्ये काय असणार?
- नदी प्रदूषण करणारे स्रोत शोधणे
- नद्यांना येऊन मिळणारे ओढे-नाल्यांची साफसफाई करून प्रदूषण रोखण्यासाठी उपयोजना सुचविणे
- कारखाने आणि गावातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित करणे
- पावसाळ्यात पूर येणारा भाग निश्चित करणे आणि त्या ठिकाणी उपाययोजना सुचविणे
- नद्यांच्या काठांवर कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प प्रस्तावित करणे
- प्रक्रिया केलेले सांडपाणी शेतीसाठी कसे वापरता येईल याचे नियोजन करणे
काय फायदे होणार?
- जलप्रदूषण कमी होणार
- प्रक्रिया केलेले जादा पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार
- कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागेल
- हद्दीतील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल
- जीवनमान उंचविण्यासाठी उपयोग होईल