
पुणे (Pune) : प्रवाशांची सुरक्षा व संख्या मोजण्यासाठी ‘पीएमपी’ बसमध्ये ‘एआय’वर आधारित कॅमेराचा वापर केला जाणार आहे. यात एक कॅमेरा बसच्या स्टिअरिंगजवळ लावण्यात येणार असल्याने चालकावरदेखील नजर असणार आहे. ‘पीएमपी’ प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार केला असून तो अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच सर्व बसमध्ये ‘एआय’चे कॅमेरे बसविले जातील. यासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च आहे. असे झाले तर बसमध्ये ‘एआय’चा वापर करणारी ‘पीएमपी’ देशातील पहिली प्रवासी वाहतूक करणारी संस्था ठरेल.
चालकांच्या चुकांमुळे ‘पीएमपी’चे अनेक अपघात झाले आहेत. शिवाय वाहतूक नियमांचेदेखील वारंवार उल्लंघन होते. या सर्व बाबींवर आता ‘एआय’ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवणात येणार आहे. जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. एप्रिलच्या अखेरीस ‘पीएमपी’ प्रशासनाला महामार्ग मंत्रालयाने दिल्लीत सादरीकरण करण्यास बोलाविले आहे. सादरीकरण झाल्यावर बसमध्ये ‘एआय’ कॅमेरे बसविण्यासाठी निधी उपलब्ध होईल. प्रत्येक बसमध्ये दोन कॅमेरे बसविले जातील. यात एक प्रवाशांवर तर दुसरा चालकावर नजर ठेवेल.
‘एआय’चा वापर कशासाठी?
- महत्त्वाच्या मार्गावर विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांची मोठी गर्दी असते
- काही प्रवासी गर्दीचा गैरफायदा घेत विनातिकीट प्रवास करतात
- ‘एआय’ कॅमेरा प्रवाशांची संख्या मोजून त्याचा संदेश वाहकाला देईल
- त्यामुळे विनातिकीट प्रवासाला चाप बसेल
चालकांवर विशेष लक्ष
- बस चालविताना चालकाला डुलकी लागत आहे का? हे पाहिले जाईल
- चालकाला झोप येत असेल तर अलार्म सिस्टीमद्वारे प्रशासनाला समजेल
- चेहऱ्यावरील हावभाव कॅमेऱ्यात कैद होईल
- चालकाला काही त्रास होतो आहे का? तो रागात आहे का? हे कळेल
‘पीएमपी’ बसमध्ये ‘एआय’ आधारित कॅमेरे बसविण्यासाठी ‘मॉर्थ’कडे परवानगी मागितली आहे. ती मिळताच कॅमेरे बसविण्यास सुरुवात होईल. वाहतुकीचा दर्जा सुधारण्यासाठी याचा चांगला फायदा होईल.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे