
पिंपरी (Pimpri) : वारंवार आवाहन करूनही शहरातील बहुतांश थकबाकीदारांनी ३१ मार्चअखेरपर्यंत थकीत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. अशा मालमत्ता एक एप्रिलपासून कोणत्याही क्षणी जप्त केल्या जातील, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ सोमवारी (ता. ३१) संपले. नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ मंगळवारपासून (ता. १) सुरू होणार आहे. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ सह त्यामागील वर्षांचा मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रकारे प्रयत्न केला. थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केले. मालमत्ता ‘सील’ करून जप्त केल्या. काहींचा लिलाव केला असून, काहींची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. करभरणा करावा, यासाठी ध्वनिक्षेपके, मोबाइलद्वारे संपर्क साधला. एसएमएमद्वारे थकबाकीदारांना कळविले. अनेकांचे नळजोड खंडित केले. तरीही, बहुतांश जणांनी करभरणा केलेला नाही. त्यांच्या सोईसाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात सोमवारी (ता.३१) रात्री बारा वाजेपर्यंत करसंकलन विभागाचे सर्व १८ कार्यालये खुले ठेवले होते. शिवाय, ऑनलाइन करभरणा सुविधाही उपलब्ध होती.
दृष्टिक्षेपात शहर
एकूण मालमत्ता : ६ लाख ५५ हजार
जप्ती कारवाई : १,०६९
नळजोड तोडणी : १,०२०
लिलाव प्रक्रियेतील मालमत्ता : ४३४
कर भरणाऱ्यांना गुलाबाचे फुल
महापालिका करसंकलन विभागाचे शहरातील सर्व १८ विभागीय कार्यालये सोमवारी (ता. ३१) रात्री १२ वाजेपर्यंत खुली होती. या दिवशी कर भरण्यासाठी आलेल्यांचे संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन विभागाने शहरातील १८ विभागीय करसंकलन कार्यालये व कॅश काउंटर्स सोमवारी (ता.३१) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत खुली ठेवली आहेत. तरीही कर न भरणारे ‘डिफॉल्टर लिस्ट’मध्ये जातील. त्यांच्यावर कारवाई सुरूच राहणार आहे.
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, महापालिका
महापालिकेने कर थकबाकी वसुली मोहीम राबविली आहे. आतापर्यंत एक हजार ६९ पेक्षा अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. जवळपास एक हजार २० पेक्षा अधिक नळजोड खंडित केले आहेत. ही कारवाई नवीन आर्थिक वर्षातही सुरूच राहणार आहे. थकबाकीदारांनी करभरणा तत्काळ करावा.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका