पिंपरी (Pimpri) : सुमारे ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चून निर्धारित मुदत उलटूनही अर्धवट असलेल्या सांगवी-बोपोडी पुलाच्या सुशोभीकरणाचा घाट पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून घातला जात आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे, जादाचा खर्च नेमका कोणाच्या हितासाठी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने सांगवी - बोपोडी असा मुळा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जवळपास ३२ कोटी ३६ लाखांचा खर्च करून या पुलाची उभारणी करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहराला जोडणारा हा पूल आहे. त्यामुळे, पुलाचे उत्तमरीत्या सुशोभीकरण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यानुसार, पुलाचे संकल्पचित्र व प्राथमिक आराखडा बनविण्यात आला आहे. अंतिम आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार, पुलाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
पुलाच्या कामावेळीच सुशोभीकरण
या पुलाच्या कामाच्यावेळीच सुशोभीकरण करण्याचे निश्चित केले असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे, सुरूवातीला केवळ पुलाच्या कामाचीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
निर्धारित मुदत संपूनही काम अपूर्णच
सांगवी-बोपोडी पुलाच्या कामाची निर्धारित मुदत दोन वर्षे होती. मात्र, पुण्याकडील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राची जागा मिळण्यास विलंब झाल्याने ठेकेदाराला ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे, रहदारी सुरू करण्यात आलेली नाही. ही वस्तुस्थिती असतानाही पुलाच्या सुशोभीकरणासाठी नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. केवळ सुशोभीकरणावर तब्बल १९ कोटी ६३ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. या नव्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ऑगस्ट महिन्यात स्थायी समितीत मान्यता घेतली आहे.
पुलाच्या सुशोभीकरणाचे यापूर्वीच नियोजन केले होते. त्यावेळी पुलासह सुशोभीकरणाचे एकत्र काम काढले नाही. त्यावेळी ते काम रखडले. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे काम करण्यात येणार होते. त्यासाठी आता नव्याने टेंडर काढले आहे.
- प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका