Pune : पीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रस्ते बनले धोकादायक
पुणे (Pune) : वारजे भागातील काही वाँशिग सेंटरचे पाणी रस्त्यावर सोडले जात असून, या ऑइलमिश्रीत पाण्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. शिवाय रस्तावर खड्डेही पडले असून, अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे महापालिका (PMC) प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वारजे जकात नाका ते चर्च रस्त्यावरील दत्तमंदिरासमोर वाहनांसाठी वॉशिंग सेंटर असून, या चालकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने दिसत आहे. गाडी धुतल्यानंतर चिखल, माती सांडपाणी वाहिनीअभावी रस्त्यावर जात आहे. या चिखलात ऑइल मिसळत असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय जवळ असल्याने रहदारी वाढली आहे. पण या वॉशिंग सेंटरचालकांच्या बेजबाबदार कामामुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे.
वारजेमधील सेवा रस्त्यावरील एका वॉशिंग सेंटर चालकाने हे ऑइलमिश्रीत पाणी चक्क रस्त्यावर सोडले आहे. तसेच सेवा रस्त्यावर खड्डे पडले असून, यामुळे अपघातही होत आहेत. महापालिका प्रशासनाने या वॉशिंग सेंटरचालकांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
अशी आहे परिस्थिती...
- अनेक वॉशिंग सेंटर चालकांची महापालिकेकडे नोंदणी नाही
- बहुतांश वॉशिंग सेंटर चालकांकडे पिण्याचा पाण्याचे अनधिकृत कनेक्शन
- गाडी धुतल्यानंतर पाणी, चिखलाचा निचरा होण्यासाठी अपूर्ण सांडपाणी व्यवस्था
संबंधित वॉशिंग सेंटरचालकांकडून आरोग्य संबंधित प्रमाणपत्रांची तपासणी सुरू करणार आहे. अनधिकृत नळजोड असेल, तर पाणीपुरवठा विभाग कारवाई करेल. इतर ठिकाणी जाऊन तांत्रिक बाबींची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- गणेश खिरीड, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय
संबंधित वॉशिंग सेंटरचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुन्हा तक्रार आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
- राजेश गुर्रम, उपअभियंता, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय