
पिंपरी (Pimpri) : पवना नदी मामुर्डीजवळ उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करते. याच ठिकाण नदीचा घात झाला असून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारण, गहुंजे - मामुर्डी सीमेवरील नाला आणि देहूरोडकडून येणारा मामुर्डी नाला यासह ग्रामीण भागातील सांगवडे व जांबेतील सांडपाणीही त्या भागातील नाल्यांद्वारे थेट नदीत मिसळत आहे. त्यात किवळे नाल्याची भर पडली आहे. या नाल्यालगतची सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज लाइन) फुटलेली असून त्यातून गळणारे सांडपाणी नाल्याद्वारे थेट नदीत जात आहे.
पिंपरी-चिंचवडच्या मध्यातून पवना नदी वाहते. तिचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने दोन्ही काठांवर काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहेत. त्याद्वारे सांडपाणी व मलनिःसारण नलिकांसह नाल्यांद्वारे येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, अनेक ठिकाणी सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे आढळून आले.
त्यात गहुंजे व मामुर्डी गावांच्या सीमेवरील व देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतून येणाऱ्या आणि ग्रामीण अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील सांगवडे व जांबे या गावांतून येणाऱ्या नाल्यांचा मोठा वाटा आहे.
या भागातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. गावांतील गटारांद्वारे नाल्यांत आणि त्यातून थेट नदीत सांडपाणी मिसळत आहे. त्याचा काळवंडलेला प्रवाह नाल्याच्या मुखाजवळ बघायला मिळतो.
आढळलेले वास्तव...
- गहुंजे व मामुर्डी गावांच्या सीमेवरील नाल्याच्या द्रुतगती मार्गावरील पुलाजवळ ड्रेनेज लाइनऐवजी उघड्यावरून सांडपाणी खळाळत वाहते. या पुलाखालीच जलवाहिनी असून त्यातून गळती होत आहे. सांडपाण्याची पातळी वाढल्यास जलवाहिनीत मिसळू शकते. हे पाणी नाल्यातून थेट नदीत मिसळत आहे.
- मामुर्डी नाल्यावरील सिंबायोसिस शैक्षणिक संकुलाजवळ नाला तुडूंब भरून सांडपाणी वाहिनीवरून वाहत आहे. तिथे नाल्यावर छोटा बांध घालून सांडपाणी वाहिनीद्वारे पुढे नेण्याचे नियोजन आहे. मात्र, बांधामध्ये गाळ साचून तो तुडूंब भरला आहे. त्यातील सांडपाणी नाल्याद्वारे थेट नदीत मिसळत आहे.
- किवळे नाल्याची बांधणी केलेली आहे. मात्र, गावठाणाजवळील पुलानजीकच्या सार्वजनिक स्वच्छतागृहापासून नदीपर्यंत नाला नैसर्गिक स्थितीत आहे. त्यालगत सांडपाणी वाहिनी टाकून प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेली आहे. मात्र, नाल्यालगतच सांडपाणी वाहिनी फुटलेली असून सांडपाणी नाल्यातून थेट नदीत मिसळत आहे.
- मामुर्डी, किवळे, गहुंजे भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून लोकसंख्याही वाढत आहे. परिणामी, सांडपाणी निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. नाल्यांद्वारे ते थेट नदीत मिसळत आहे.
- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात सांडपाणी मामुर्डी नाल्याद्वारे नदीत मिसळत आहे.
- मामुर्डी, किवळे परिसरात नदीचे पाणी काळसर झाले असून त्यावर तेलकट तवंग पसरला आहे, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवतही वाढले आहे.
किवळे, मामुर्डी भागात बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असून सांडपाणी निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ते सांडपाणी थेट पवना नदीत मिसळून प्रदूषण वाढत आहे. ते रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. अद्याप महापालिकेने कार्यवाही केलेली नाही.
- प्रसाद धुमाळ, पर्यावरण प्रेमी, किवळे
किवळे, मामुर्डी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी असावेत, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. पण, अधिकारी केवळ ‘एसटीपी करू’ असे म्हणतात. प्रत्यक्ष कार्यवाही नाही. केवळ ड्रेनेज लाइन टाकली आहे. तीही काही ठिकाणी फुटली आहे. त्यातून सांडपाणी नाल्यात जाते व नदीत मिसळते. एसटीपी लवकर करायला हवेत.
- दीपक तरस, सदस्य, पवना जलमित्र, किवळे