चाकण, ता. २१ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची टेंडर (Tender) प्रक्रिया सध्या सुरू आहे. चाकण-तळेगाव-शिक्रापूर या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) ना हरकत दाखला देऊन या मार्गाचे काम ‘एमएसआरडीसी’ने करावे, अशी भूमिका घेतली आहे.
यासंदर्भात नागरिकांमध्ये मोठा भ्रम निर्माण झाला आहे. या मार्गाचे कामही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणनेच करावे, अशी मागणी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली. या रस्त्यांची कामे ‘एनएचएआय’कडून झाल्यास या कामांना गती निर्माण होईल.
चाकण औद्योगिक वसाहतीत वाहतूक कोंडीमुळे कारखानदारी संकटात आहे. चाकण, शिक्रापूरकडून येणाऱ्या व मुंबई, तळेगावकडे येणाऱ्या-जाणाऱ्या चाकण परिसरातील व औद्योगिक वसाहतीतील वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. या वाहतूक कोंडीला स्थानिक नागरिक तसेच प्रवासी, उद्योजक, कामगार वैतागले आहेत.
चाकण-तळेगाव-शिक्रापूर महामार्ग लवकर होण्याची अपेक्षा आहे. या मार्गाचे काम फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पूर्ण करेल, असे सर्वसामान्यांचे मत आहे. त्यामुळे हा महामार्ग त्यांच्या मार्फतच व्हावा, अशी मागणी मेदगे यांनी गडकरी यांच्याकडे केली.
त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांचे तांत्रिक सल्लागार बी. डी. ठेंग यांना ही ‘एनओसी’रद्द करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेच या रस्त्याचे काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पार पडली तर, पुढील टेंडर प्रक्रिया केंद्रामार्फत होऊ शकते. राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’ला येथे कुठलेही काम करण्याची परवानगी मिळू शकत नाही. या भेटीवेळी राहुल गोरे, प्रसन्ना डोके, जीवन शिंदे, अशोक कांडगे आदी उपस्थित होते.