पुणे (Pune) : ‘‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग करताना सुमारे ८०० झाडांचे पुनर्रोपण केले, ती झाडे सुमारे १०० वर्षांपेक्षा जुनी होती. आता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गांवर सुमारे ४२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे लावल्यानंतर पालखी मार्ग ग्रीन हायवे होईल,’’ असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यात व्यक्त केला.
श्री संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर मार्गाचे चौपदरीकरण, वारजे-सिंहगडदरम्यान सेवारस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन शनिवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. कर्वेनगर येथील कमिन्स महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, उमा खापरे, माजी आमदार जगदीश मुळीक, विभागीय आयुक्त पांडुरंग पुलकुंडवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले...
- पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग बांधताना काही चुका झाल्या
- द्रुतगती मार्ग कात्रज घाटापर्यंत जोडण्याचा विचार होता; मात्र अधिकाऱ्यांनी होऊ दिला नाही
- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून दुरुस्ती होत नाही
- जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी ‘एमएसआरडीसी’ची आहे
- ‘एमएसआरडीसी’ने तीन महिन्यांत खड्डे न बुजविल्यास रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात घेऊ
पुण्यातील कोंडीसाठी ‘मास्टर प्लॅन’ :
पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुण्याला जोडणाऱ्या चारही मार्गांचा विकास केला जाणार आहे. ‘रिंगरोड’च्या माध्यमातून चारही बाजूंच्या रस्त्यांना जोडले जाईल. पुण्यातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी पुण्यात इथेनॉलवर वाहने धावली पाहिजे. यासाठी पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू झाले पाहिजे. याकरिता राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे गडकरी यांनी म्हणाले.
‘रिंगरोड’सह अन्य रस्ते जोडणार :
गडकरी म्हणाले, ‘‘मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्ग पुण्यातील रिंगरोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील अटल सेतूवरून निघाल्यास दोन तासांत पुण्याला पोहोचणे शक्य होईल. पुण्याहून-बंगळूरला अवघ्या चार तासांत पोहोचणे शक्य होईल. पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर ते यवतदरम्यान सुमारे ३३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पाच हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुणे-सातारा रस्त्यावरही उड्डाणपूल असेल, यासाठी सुमारे पाच हजार कोटींचा खर्च आहे. नाशिक फाटा येथेही सुमारे सात हजार ५०० कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.’’
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
- पुण्यात मेट्रोसेवेचा विस्तार होणार
- आम्ही रिंगरोडची कल्पना प्रत्यक्षात आणली
- पालखी तळाच्या बऱ्याचशा जागेचे अधिग्रहण झाले आहे
- भविष्यात या जागेवरच वारकऱ्यांना सोयी-सुविधा निर्माण करू
- पुण्यात ई-बस धावत असल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे
- पुण्याचा चेहरा बदलण्याचे काम गडकरी व महायुतीच्या सरकारने केले आहे
- गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात साडेतीन लाख नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला
सुळेंच्या भाषणात श्रीरामाच्या घोषणा :
खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू होताच उपस्थितांनी ‘जय श्री रामा’च्या घोषणा दिल्या. त्यावेळी सुळे म्हणाल्या, ‘‘हा पक्षाचा कार्यक्रम नाही. गडकरी यांचे आभार मानण्यासाठी मी येथे आहे.’’ असे सुळे यांनी सांगितल्यावरही उपस्थितांपैकी काहींनी आभार मानायलाच पाहिजे असे म्हटले, त्यावर काहीशा आक्रमक झालेल्या सुळे म्हणाल्या, ‘‘यावर मी उत्तर देऊ शकते; पण येथे देणार नाही.’’ असे म्हणत त्यांनी मनोगत पुढे सुरू ठेवले.