.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पिंपरी (Pimpri) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या पीएमआरडीएच्या नियोजन समितीच्या सभेला मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे समितीची सोमवारी बैठक होणार आहे. त्यामुळे, नवीन विकास आराखडा मंजूर करणे, निधीची उपलब्धता, अर्थसंकल्प मांडण्याला मंजुरी देणे आदींसह पीएमआरडीएचे रखडलेले विविध प्रस्ताव मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
या सभेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ जाहीर करण्यात आली आहे. या सभेसाठी पाच वेळा तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर सोमवारचा (ता. २३) दिवस बैठकीसाठी निश्चित करण्यात आला आहे. राज्य शासनाने पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी २०१५ मध्ये पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना केली. मुख्यमंत्री हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. दरवर्षी अर्थसंकल्पासाठी सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा अकरावी सभा ही खूपच लांबली. जानेवारी महिन्यापासून या सभा तारखेअभावी होऊ शकल्या नाही. दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही बैठक रद्द केली होती; तर काही कारणांनी अनेकदा बैठक होऊ शकल्या नाहीत. तसेच मुख्यमंत्री विविध कामांसाठी पुण्यात येणार असल्याने या सभेसाठी वेगळी वेळ काढण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांना पीएमआरडीएसाठी वेळ देणे शक्य झाले नव्हते.
तब्बल १६ महिन्यांनी सभा होणार
प्रशासनाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. येत्या सोमवारी नगर विकास विभागाकडून त्याचे पत्र प्राधिकरण कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे, ही सभा सोमवारी पार पडेल असे, पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री उपस्थितीत असलेल्या सभेनंतरच प्राधिकरणाच्या कामांना मंजुरी मिळत असते. यापूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये सभा झाली होती. त्यानंतर, आता थेट ऑक्टोबर महिन्यातच म्हणजे १६ महिन्यांनी ही सभा होणार आहे.
कोणते प्रकल्प प्रलंबित?
मेट्रो प्रकल्पानंतर पीएमआरडीएकडे आणखी अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यापैकी रिंग रोड, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, म्हाळुंगे-माण टीपी स्कीम, नियोजित गृहप्रकल्प, रस्त्याच्या कामांबरोबरच साडेआठशे गावांना देण्यात येणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे कामांची गती मंदावली आहे. या सभेनंतर विविध विषयांना मान्यता मिळणे अपेक्षित आहे.
पीएमआरडीए नियोजन समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळाली आहे. सोमवारी (ता. २३) ही बैठक होणार आहे.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए