पुणे (Pune) : कोथरूड येथील इंदिरा शंकर नगरी परिसरातील सुमारे १४ एकर परिसरात वसलेल्या ३६ हून अधिक सोसायट्या आणि ६० रो-हाऊस यांचे एकत्रित मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी इंदिरा शंकर नगरी सहकारी गृहरचना संस्थांच्या संघाने (फेडरेशन) जिल्हा उपनिबंधकांकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या फेडरेशनच्या विरोधात लढणाऱ्या सोसायट्यांनी पहिली लढाई जिंकली आहे.
इंदिरा शंकर नगरी हा सुमारे १४ एकरच्या परिसरात असलेल्या सोसायट्यांचा प्रकल्प आहे. या सोसायट्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि त्यांची मान्यता न घेता इंदिरा शंकर नगरी सहाकारी गृहरचना संस्थांचा संघ (फेडरेशन) मर्यादित स्थापन करण्यात आला. या फेडरेशनच्या नावाने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संपूर्ण परिसराच्या पुनर्विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून टेंडर मागविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
या परिसरातील काही सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण झाले असून, ७/१२ उताऱ्यावर त्या सोसायट्यांची नावेदेखील लागली आहेत. तर काही सोसायट्यांची प्रक्रिया सुरू आहे. असे असताना या सोसायट्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता एक फेडरेशन स्थापन करण्यात आले.
त्या फेडरेशनचे सभासद म्हणून या सोसायट्यातील अध्यक्षांची नावे सभासद म्हणून दर्शविण्यात आली. त्यासाठी या अध्यक्षांच्या नावाने शुल्कही भरल्याचे दाखविले. फेडरेशनच्या नावाने संपूर्ण परिसराचे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करण्यात आला. उपनिबंधकांकडून सोसायट्यांना नोटिसा आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
सोसायट्यांच्या लढ्याला यश
२० ते २२ हून अधिक सोसायट्यांनी विरोध केल्यामुळे कोथरूड परिसरात हा चर्चेचा विषय झाला होता. तर फेडरेशनने जिल्हा उपनिबंधकांकडे मानीव अभिहस्तांतरणासाठी केलेल्या अर्जाविरोधात या सोसायट्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज दाखल होता. त्यावर उपनिबंधकांपुढे सुनावणी सुरू होती.
दरम्यान, सोसायट्यांकडून होत असलेल्या या विरोधाची दखल घेत फेडरेशनने स्वत:हून या संपूर्ण परिसराच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी केलेला अर्ज मागे घेत असल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांना दिले आहे. फेडरेशनच्या विरोधात सोसायट्यांनी एकत्र येत दिलेल्या लढ्याला अखेर यश आल्याची भावना तेथील रहिवाशांनी बोलून दाखविली.
‘जिल्हा उपनिबंधकांकडून निर्णय अपेक्षित’
‘‘इंदिरा शंकर नगरी परिसराचे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी फेडरेशनच्या वतीने जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करण्यात आला होता. तो अर्ज फेडरेशनने मागे घेतला आहे. तसे पत्रही फेडरेशनने जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांना दिले आहे. लवकरच त्यांच्याकडून यावरील निर्णय अपेक्षित आहे,’’ अशी माहिती तेथील रहिवासी महेंद्र काळे, नीलेश सौंदाणे, रमेश घारे, दिलीप शिंदे, आशिष चोबे, बंडोपंत सोयाम, प्रभा काळे आणि नितीन ठाकूर यांनी दिली.