
पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड महापालिकेने महामेट्रोला रस्ता दुरुस्तीसाठी गेली तीन वर्ष पत्रव्यवहार केला. मात्र, महापालिकेच्या या पत्राला मेट्रोकडून केराची टोपली दाखवली जात आहे. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याकडे मेट्रो प्रशासन दुर्लक्ष करत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत दापोडीतील हॅरिस पूल ते चिंचवडचा मदर तेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रोची मार्गिका सुरु आहे. त्याचे सुमारे ७.५ किलोमीटर अंतर आहे. पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट अशी मेट्रो सुरु होऊन अडीच वर्ष झाले. तरी देखील मेट्रो स्टेशनची किरकोळ कामे अद्याप सुरुच आहेत. मात्र, जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील दापोडी ते चिंचवड पर्यंतचा ग्रेड सेपरेटरमधील सिमेंट रस्ता, इन आणि आउट रस्ते, बीआरटी बस थांब्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. ग्रेडसेपरेटर रस्त्याची तर पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. मेट्रोच्या कामामुळे ग्रेड सेपरेटर सिमेंट काँक्रिट रस्ता रस्ता पूर्णपणे खराब होऊन जागोजागी भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी सळईदेखील बाहेर दिसू लागल्या आहेत.
फुगेवाडी, नाशिक फाटा, शंकरवाडी, संत तुकारामनगर स्टेशन येथील काँक्रिटच्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी काँक्रिटचा थर वाहून खडी बाहेर आलेली आहे. सुरक्षा कठडे देखील तुटले आहेत. सेवा रस्ता व ग्रेड सेपरेटर रस्त्यामधील दुभाजकावरील कठडेही अनेक ठिकाणी तुटली आहेत. काही ठिकाणी बांधकाम राडारोडा रस्ता दुभाजकांमध्ये पडून आहे. रस्ता दुभाजकांची सुशोभिकरणास लावलेली झाडे, रोपे जळाली आहेत. अनेक जुनी झाडेही निष्पर्ण झाली आहेत. तेथे कचरा साचला आहे. हा प्रकार संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी येथील मेट्रो स्टेशनखाली देखील दिसून येत आहे. रस्त्यांची दुरुस्ती मेट्रोकडून करणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप ते झाले नाही.
‘‘मेट्रोमुळे ज्या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ते रस्ते दुरुस्त करून द्यायला मेट्रो प्रशासन तयार आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार आम्ही रस्ते दुरुस्त करून देऊ.
- हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो