
पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक ६० गुंठे महत्त्वाच्या जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला सोमवारी (ता. २३) मिळाला. महापालिकेने तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून जमीन समपातळीवर आणण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे टिळेकरनगर ते खडीमशिन चौकादरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होईल.
कात्रज-कोंढवा मार्गावर खराब रस्ता आणि अवजड वाहतुकीमुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम तातडीने व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. रुंदीकरणासाठी आवश्यक जागा मालकांकडून देण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेची अडचण झाली होती. अखेर महापालिकेने ८४ ऐवजी ५० मीटर रुंदीकरणाचे काम सुरू केले. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही रस्त्याची पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता.
दरम्यान, महापालिकेने जागा मालकांशी सातत्याने संवाद साधून जागा देण्याची विनंती केली होती. कोंढव्यातील टिळेकरनगर ते खडीमशिन चौक या २४ मीटर रुंद व ३०० मीटर लांब जागा सोमवारी महापालिकेच्या ताब्यात आली. या रस्त्यावरील सर्वांत मोठी जागा असलेल्या एका नागरिकास महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद साधून रस्त्याच्या कामाबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ ६० गुंठे जागा रुंदीकरणाच्या कामासाठी देण्यास मंजुरी दिली. त्यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून जमीन समपातळीवर आणण्याच्या कामाला महापालिकेने सुरुवात केली.
पालकमंत्र्यांचे जागा मालकांना फोन :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये कात्रज-कोंढवा रस्त्याच्या प्रलंबित कामाचाही आढावा घेतला. भूसंपादनाचे काम वेगाने करण्याच्या सूचना पवार यांनी महापालिकेला दिल्या होत्या. तेवढ्यावरच न थांबता भूसंपादनासाठी आवश्यक जागा मिळावी, यासाठी पवार यांनी स्वतः संबंधित नागरिकांशी संवाद साधून महापालिकेला सहकार्य करण्यास सांगितले होते.
‘‘मागील अनेक वर्षांपासून रुंदीकरणासाठी जागेची आवश्यकता होती. ६० गुंठे जागा उपलब्ध झाल्याने रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जमीन ताब्यात घेतल्यानंतर तेथे तातडीने काम सुरू केले आहे.’’
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका