
पिंपरी (Pimpri) : काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटी मार्ग अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. पुणे-नाशिक आणि बंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता सध्या विविध समस्यांना तोंड देत आहे. जागा मिळेल तेथे बेशिस्तपणे जड-अवजड वाहने उभी असतात. सायंकाळी आठनंतर खासगी ट्रॅव्हल्स बसेसची रांग लागते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि काळेवाडी फाटा तसेच वाकड येथील छत्रपती चौकापर्यंत दररोज वाहतूक कोंडी होते. महापालिका, पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळेच हे नियम धाब्यावर बसवले जात आहे.
तब्बल एक-दीड कि.मी.पर्यंत वाहनांनच्या रांगा
चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरून काळेवाडी फाटा मार्गाकडे जाताना डाव्या बाजूला बांधकाम साहित्य विक्री, अन्नपदार्थ आणि घरगुती साहित्य विक्रीची दुकाने आहेत. आठवडे बाजारात येणारे ग्राहक तेथेच वाहने उभी करतात. सायंकाळी खासगी चारचाकी, तसेच प्रवासी बसेस उभ्या केल्या जातात. मोकळ्या जागा जड-अवजड वाहनांनी बळकावल्या आहेत. उजव्या बाजूला किरकोळ हॉटेल्स, मंगल कार्यालय, पंक्चर दुरुस्तीची दुकाने आहेत. या सर्वांमुळे बऱ्याचदा एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात.
ग्राहकांच्या वाहनांचा अडथळा
काळेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक (एमएम महाविद्यालय) ते तापकीर चौकापर्यंत डाव्या बाजूला अतिक्रमणांचा विळखा आहे. रुग्णालये, कापड दुकाने, स्वीट मार्ट, दुग्धजन्य पदार्थ दुकानांमध्ये येणारा प्रत्येकजण आपले वाहन रस्त्याकडेला उभे करतो. मुख्य चौकातून काळेवाडी फाट्याच्या दिशेने जाताना कोपऱ्यावर हातगाड्या असतात. तापकीर चौकात सिग्नल लागल्यानंतर मुख्य चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. तर, रस्त्याच्या उजव्या बाजूला शॉपिंग मार्ट, शाळा, एमएम फार्मसी महाविद्यालय आणि किरकोळ दुकाने असल्यामुळे तेथेही कोंडी होते. शॉपिंग मार्टमध्ये आलेले ग्राहक आपले वाहन रस्त्याबाजूला लावून बराचवेळी खरेदीसाठी जातात. तेथील स्वतंत्र वाहनतळ अपुरे पडत असल्याने ही स्थिती आहे. तापकीर चौकातील सिग्नल सुटल्यानंतर येणाऱ्यांना या अनधिकृत वाहनतळाचा अडथळा होतो.
फेरीवाल्यांचे अतिक्रमण
तापकीर चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला खासगी प्रवासी वाहतुकीच्या एजंट्सची दुकाने आहेत. येथे तिकीट बुकिंगसाठी येणारे आपली वाहने समोर लावतात. बससाठी आलेले प्रवासी तेथेच उभे राहतात. नातेवाईकांना बसपर्यंत सोडण्यासाठी आलेले वाहनचालक तेथेच असतात. या सर्व स्थितीचा सार्वजनिक वाहतुकीला त्रास होतो.
रस्ते व्यापले टपऱ्यांनी
बीआरटी रस्त्याच्या उजवीकडे काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा चौकापासून तापकीर चौकाकडे सुमारे पाचशे ते सातशे मीटर जागा फळे, भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी व्यापलेली असते. सोबतच खाद्यपदार्थांचे गाडेही येथे असतात. सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत बेकायदेशीर विक्रेत्यांमुळे काळेवाडी फाटा येथून तापकीर चौकाकडे जाताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
पादचारी मार्गातील अडथळे
- काळेवाडी, रहाटणी फाटा येथे नियमबाह्य ऑटो रिक्षा थांबा
- अर्बन स्ट्रीट डिझाइन फुटपाथवर अतिक्रमणे
- पदपथावर आणि लगत खासगी बसचे थांबे
- मद्यविक्री दुकानामुळे नागरिकांना त्रास
- बीआरटी बस थांब्याकडे जाताना कोंडीचा त्रास
प्रशासकीय उदासीनता
- बेशिस्त वाहनांवर कारवाई नाही
- अवैध वाहनतळाकडे दुर्लक्ष
- फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांकडे कानाडोळा
- सिग्नल कधी सुरू, तर कधी बंद
- वाहतूक पोलिस कधी असतात, तर बऱ्याचदा गायब