Home
HomeTendernama

पिंपरीतील आर्थिक दुर्बल घटकांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; एवढी घरे

पिंपरी (Pimpri) : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी आकुर्डी व पिंपरीत गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यात ९३८ सदनिका असतील. त्यासाठी नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. बुधवारपासून (ता. २८) अर्ज वितरण व स्वीकृती केली जाणार आहे. अनामत रकमेसह २८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Home
बिहारमध्ये कोसळलेल्या पुलाचे काम करणाऱ्या कंपनीलाच मुंबईत पुलाचे..

आकुर्डीतील आरक्षण क्रमांक २८३ व पिंपरीतील आरक्षण क्रमांक ७७ येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी आलेल्या ऑनलाइन अर्जांची छाननी करून लाभार्थी निश्चित केले जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विजेता यादीत नाव आलेल्या लाभार्थ्यांच्या नावे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावे संपूर्ण भारतात पक्के घर नसावे. जर आढळल्यास त्या लाभार्थ्याचे नाव विजेता यादीमधून वगळण्यात येईल. महापालिका हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे. आवास योजनेतील अर्जदार महिला असल्यास त्यांचेच जात प्रमाणपत्र सादर करावे. कुटुंबातील अन्य सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. आवास योजनेअंतर्गत महिलेने लग्नाच्या अगोदर अर्ज केला असेल आणि दरम्यानच्या काळात लग्न झाले असेल, तसेच अर्जदार महिलेच्या नावात बदल झाला असल्याबाबत मूळ गॅझेट व मूळ मॅरेज सर्टिफिकेट सादर करावे. विशेष मागास प्रवर्गातून अर्ज केलेल्यांना इतर मागास प्रवर्गामध्ये ग्राह्य धरले जाईल. अर्जातील माहिती चुकीची असल्यास अर्जदार जबाबदार असेल.

Home
BMC : जम्बो कोविड सेंटर टेंडर प्रकरणी आयुक्तही अडचणीत?

लाभार्थी स्वहिस्सा १० टक्के रक्कम सोडतीनंतर १५ दिवसांच्या आत भरल्यानंतरच सदनिका वाटपपत्र मिळेल. स्वहिस्सा रक्कम न भरल्यास प्रतीक्षा यादीतील लाभार्थीला प्राधान्य दिले जाईल. उर्वरित ९० टक्के रक्कम एक महिन्याच्या आत भरावयाची आहे. सोडतीनंतर ४५ दिवसात संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक राहील. उर्वरित रकमेसाठी बँकांकडून कर्ज घेण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची असेल. महापालिका कुठलीही हमी घेणार नाही. बॅंकेकडून कर्ज मंजूर पत्र आल्यानंतरच महापालिका ना-हरकत दाखला देईल. कर्जाबाबतच्या अडचणींबाबत परस्पर बँकेशी संपर्क साधावा. स्वहिस्सा रक्कम मुदतीत न भरल्यास लाभार्थ्यांचा लाभ रद्द केला जाईल. सदनिकेचा ताबा घेण्यापर्यंत व स्वहिस्सा रक्कम भरल्यानंतर सदनिका घेण्यास इच्छुक नसल्यास रद्दकरण शुल्क १० टक्के वजा करून स्वहिस्सा रक्कम परत दिली जाईल. १० वर्षांपर्यंत सदनिकेची विक्री करता येणार नाही किंवा भाडेपट्ट्याने देता येणार नाही. सदनिकेची अनधिकृत विक्री, हस्तांतरण झाल्याचे आढळून आल्यास लाभार्थ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच १० वर्षांनंतर सदनिका विक्री करावयाचे झाल्यास त्यावेळच्या बाजारभावानुसार सदर सदनिकेच्या जमिनीच्या ५० टक्के रक्कम महापालिकेस द्यावी लागेल. पात्र लाभार्थ्यांनी २८ जूनपासून पिंपरी व आकुर्डी येथील प्रकल्पातील घरांसाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

Home
Pune: आता दस्तनोंदणी करतानाचा वेळ वाचणार; हे आहे कारण...

अशी आहे प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज व अनामत रक्कम भरण्यासाठी २८ जूनपासून २८ जुलैपर्यंत मुदत आहे. अर्ज https://pcmc.pmay.org या लिंकवर करावेत. अर्जासोबत १० हजार अनामत व नोंदणी शुल्क ५०० असे १० हजार ५०० रुपये ऑनलाइन भरल्यानंतर कुटुंबातील सर्वांचे आधार व पॅनकार्ड अपलोड करावे. सोडतीत ९३८ सदनिकांच्या विजेत्यांची नावे व प्रतीक्षा यादी असेल. त्या व्यतिरिक्त असलेल्या नागरिकांची अनामत रक्कम नमूद केलेल्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने १० हजार रुपये परत केले जातील. सोडतीनंतर निश्चित झालेल्या लाभार्थ्यांनी मूळ कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे नाव निवड यादीतून वगळण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

- तहसीलदारांचा २०२२-२३ चा उत्पन्नाचा दाखला किंवा एक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) किंवा फॉर्म १६/१६अ

- अर्जदाराचे जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, इतर मागासवर्गीय).

- फक्त महाराष्ट्रातील रहिवासी दाखला, उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र

- अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार व पॅनकार्ड

- अर्जदाराचे बँक पासबुक, खाते तपशील असलेले पृष्ठ व रद्द केलेला चेक

- अर्जदाराचे मतदान ओळखपत्र, पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर नोंदणीकृत भाडेकरार

- नातेवाइकांकडे राहत असल्यास त्यांचे किमान शंभर रुपयांच्या मुद्रांकावर संमतिपत्र

- चालू महिन्याचे राहत्या पत्त्यावरील वीजबिल

दृष्टिक्षेपात सदनिका

तपशील / आकुर्डी / पिंपरी

सदनिका / ५६८ / ३७०

स्वहिस्सा / ७,३५,२५५ / ७,९२,६९९

सरकारी अनुदान / २,५०,००० / २,५०,०००

एकूण रक्कम / ९,८५,२५५ / १०,४२,६९९

(टीप ः केंद्र सरकारचे १,५०,०० व राज्य सरकारचे १,००,००० रुपये अनुदान)

लाभार्थींसाठी अटी व शर्ती

- ऑनलाइन अर्ज आवश्यक

- शहरातील रहिवासी नागरिक पात्र

- वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत असावे

- अर्जदार वा कुटुंबातील व्यक्तींच्या नावे देशात कुठेही घर अथवा मिळकत नसावी

- चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु, सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतिक्षा यादीतील नागरिक अर्ज करू शकतात

‘‘आकुर्डी व पिंपरीतील सदनिकांसाठी २८ जूनपासून २८ जुलैपर्यंत नागरिकांना अर्ज करता येतील. सदनिका वाटप नियमावलीत बदल किंवा वाढ करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. नागरिकांनी नियम, अटी पडताळून पाहावेत. तसेच त्रयस्थ व्यक्तींच्या कोणत्याही आमिषांना बळी पडू नये.’’

- अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com