
पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागा भरण्यासाठी जाहिरात काढली, त्यासाठी तब्बल २८ हजार ७०० जणांनी अर्ज केले आहेत. पण गेल्या आठ महिन्यांपासून ऑनलाइन परीक्षा न झाल्याने भरती प्रक्रिया कधी होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणाचा समावेश करण्याची प्रक्रिया, लोकसभा, विधानसभेची लागलेली आचारसंहिता यांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली आहे. प्रशासकीय कामकाज पूर्ण होऊन परीक्षा घेण्यास २०२५ वर्ष उजाडणार आहे. पण यामुळे उमेदवार हवालदिल झाले आहेत. पुणे महापालिकेने २०२२ आणि २०२३ मध्ये एकूण ७४८ जागांची भरती केली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशामक दलाचे जवान, आरोग्य विभागातील काही महत्त्वाच्या पदांचा समावेश होता.
महापालिकेची हद्दवाढ झाल्याने कामाचा व्याप वाढलेला आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्याची गरज आहे, अनेक जागा रिक्त असल्याने पहिल्या टप्प्यात महापालिकेने १३५ जागा भरल्या. त्यानंतर ११३ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली.
‘आयबीपीएस’ या संस्थेच्या माध्यमातून मार्च महिन्यात यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. २८ हजार ७०० उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. याच काळात राज्य सरकारने मराठा समाजासाठी शासकीय नोकर भरतीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे या आरक्षणाचा समावेश करावा की नाही याबाबत महापालिकेने नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले होते.
त्यावर सरकारकडून लगेच महिन्याभरात मराठा समाजासाठी ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून १० टक्के आरक्षण उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
महापालिकेच्या मागासवर्ग विभागाकडून गेल्या तीन-चार महिन्यांपासून ११३ जागांसाठी मराठा आरक्षणाचा समावेश करण्याचे काम सुरू आहे. आणखी एक महिना हे काम चालणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सरकारच्या मागासवर्ग समितीकडे पाठविला जाईल. त्यांच्याकडून बिंदुनामावली तपासली जाईल. त्यात आवश्यक त्या दुरुस्ती केली जाईल.
त्यानंतर ज्या उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला आहे त्यांना मराठा आरक्षणातून अर्ज भरण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर परीक्षा घेतली जाईल.
११३ पदांची भरती ही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली. त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने या काळातही महापालिकेला कोणताही निर्णय घेता आला नाही. त्यातच ‘आयबीपीएस’ या संस्थेसोबतचा करार संपला असून त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर पुणे महापालिकेची निवडणूक पुढील काही महिन्यात होणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. त्यामुळे महापालिकेने ‘आयबीपीएस’सोबतचा करार नूतनीकरण करणे, बिंदुनामावली अंतिम करणे, उमेदवारांना आरक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देणे ही प्रक्रिया पार पाडून लवकर ऑनलाइन लेखी परीक्षा घेणे आवश्यक आहे. अन्यथा ही भरती प्रक्रिया महापालिकेच्या निवडणुकीत अडकल्यास पुन्हा काही लांबणीवर पडू शकते.
महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदाच्या ११३ जागांसाठी जाहिरात काढली आहे. त्यात १० टक्के मराठा आरक्षणाचा समावेश करण्यास सरकारने सूचना केली आहे. त्यानुसार बिंदुनामावली तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच ‘आयबीपीएस’ संस्थेसोबतच्या कराराचे नूतनीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया २०२५ मध्ये पुढील वर्षी पूर्ण होईल.
- प्रतिभा पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग
महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी मी अर्ज दाखल केला आहे. पण परीक्षा कधी होणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. महापालिका प्रशासनाने ही प्रक्रिया लवकर पार पाडावी.
- एक उमेदवार