खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत कालवा; 'असे' वाचणार 2.5 TMC पाणी

Khadakwasla Dam
Khadakwasla DamTendernama

पुणे (Pune) : खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान ७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा ‘डी’ आकाराच्या भूमिगत कालव्यातून पाणी नेण्याचा आराखडा जलसंपदा विभागाने निश्‍चित केला आहे. त्यामुळे कालव्याची वहन क्षमता १५१० क्युसेक होणार असून, ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षणाने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.

Khadakwasla Dam
लष्कराची मान्यता न मिळाल्याने पुणे-नाशिक हायस्पीडच्या मार्गात बदल

खडकवासला धरणातून काढलेला मुठा उजवा कालवा शहरातून जातो. त्यातून शहराला पाणी पुरवठा होत असल्यामुळे आजपर्यंत त्याची देखभाल-दुरुस्ती करणे जलसंपदा विभागाला शक्य होत नाही. तसेच कालव्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. त्यामुळे गळती, चोरी आदींमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय कालव्यात पडणाऱ्या कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते. कालव्याची वहन क्षमता २०५० क्युसेक आहे. प्रत्यक्षात जेमतेम १२०० ते १४०० क्युसेकनेच पाणी सोडावे लागते. यासर्व पार्श्‍वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान भूमिगत कालव्यातून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाने आखली होती. मात्र त्यासाठी निधी उभारण्याचा प्रश्‍न होता. त्यामुळे ही योजना अनेक वर्ष रखडली होती. मध्यंतरी पुन्हा या योजनेला चालना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार टेंडर मागवून एका खासगी कंपनीला हे काम दिले आहे. या कंपनीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले आहे.

Khadakwasla Dam
पुणे रेल्वे स्टेशनवरील अपुऱ्या सुविधांमुळे चार ठेकेदारांना दंड

बोअर घेण्याचे काम सुरू

बोगद्याचे काम टीबीएम मशिनच्या साहाय्याने करावयाचे झाल्यास सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च येऊ शकतो, तर डीबीएम (ड्रिल ॲण्ड बॉल्स्ट) पद्धतीने हे काम केले, तर त्यासाठी दीड हजार कोटी रुपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे हे काम कोणत्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करायचे, याचा निर्णय शासन स्तरावर झाला नाही. दरम्यानच्या कालावधीत भूमिगत कालव्यासाठी जमिनी योग्य आहे की नाही, यासाठी बोअर घेण्याचे काम सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Khadakwasla Dam
84 लाख खर्चून उपचार शून्य; नवी मुंबईतील 'हे' कोविड सेंटर रडारवर

आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य प्रकल्प

२५ किलोमीटर लांबीच्या भूमिगत कालव्यातून पाणी नेण्याच्या कामासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. साधारणतः एक टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष धरण उभारण्यासाठी सुमारे एक हजार कोटींचा खर्च येतो. त्यानुसार अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये लागू शकतात. मात्र, भूमिगत कालव्यातून पाणी नेणे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Khadakwasla Dam
पदरमोड न करता मीरा भाईंदर पालिकेने असे उभारले 150 कोटींचे नाट्यगृह

अंतर कसे कमी होणार?

१) खडकवासला ते फुरसुंगी दरम्यानचा कालवा ३५ किलोमीटर लांबीचा आहे. मात्र भूमिगत कालवा तयार करताना कालव्याचा मार्गात काही ठिकाणी बदल होणार.

२) त्यामुळे सुमारे १० किलोमीटरने अंतर कमी होऊन २५ किलोमीटर लांबीचा भूमिगत कालवा होणार.

३) धरणाच्या वरच्या बाजूपासून भूमिगत कालवा सुरू होणार असून तो थेट फुरसुंगी येथे निघणार.

४) भूमिगत कालव्यासाठी ५८ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार.

५) संबंधित कंपनीकडून अहवाल लवकरच प्राप्त होणे अपेक्षित.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com