Pune : बालभारती ते पौड फाटा रस्त्याप्रकरणी महापालिकेला मोठा दिलासा

Balbharati Paud Phata Link Road
Balbharati Paud Phata Link RoadTendernama
Published on

पुणे (Pune) : वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा प्रस्तावित असलेल्या रस्त्याच्या कामाला पर्यावरणप्रेमी, नागरिकांच्या विरोधामुळे हे काम प्रशासनाने थांबविले होते. तसेच, या कामाविरोधात ‘नागरी चेतना मंचा’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने गेल्या दीड वर्षांपासून ही प्रक्रिया ठप्प झाली होती. मात्र, आता ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Balbharati Paud Phata Link Road
Pune-Nashik Road : नाशिक फाटा ते खेडपर्यंत रुंदीकरण आणि एलिव्हेटेडला कधी मिळेल मुहूर्त?

पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात कोथरूड आणि सेनापती बापट रस्त्याला जोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून बालभारती ते पौड फाटा रस्ता दाखविण्यात आला. हा रस्ता बालभारती येथून वेताळ टेकडीवरून सुरू होता. विधी महाविद्यालयाच्या पाठीमागून जाऊन केळेवाडी येथे पौड फाट्याजवळ संपतो. महापालिकेने या कामाचा प्रकल्प आराखडा तयार केला असून, त्यासाठी २५२ कोटी १३ लाख रुपये इतका खर्च होणार आहे.

टेकडी वाचविण्यासाठी उन्नत मार्ग

महापालिकेने कर्वे रस्ता, पौड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बालभारतीपासून वेताळ टेकडीवरून थेट पौड फाट्यापर्यंत रस्ता प्रस्ताविक केला. या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आले. त्यांच्याकडून या परिसराचा अभ्यास करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर केला. त्यात काही रस्त्याचा काही भाग जमिनीवरून, तर काही भाग हा उन्नतमार्ग (इलोव्हेटेड) असणार आहे. या उन्नत मार्गामुळे टेकडी फोडावी लागणार नाही, असा दावा महापालिकेने केला होता. दरम्यान, या रस्त्याचे काम करताना पौडफाटा भागातील खाणीचा अडथळा निर्माण झाला. तसेच, हा रस्ता एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेतून, झोपडपट्टीतून जाणार होता. त्यामुळे या रस्‍त्याची जागा बदलावी लागली. सुमारे १२५ मीटर लांबून हा रस्ता आखून पौडफाट्याला जोडला जाणार आहे. हा बदल केल्याने १७ कोटीने खर्च वाढून प्रकल्पाचा एकूण खर्च २५२ कोटी १३ लाखापर्यंत गेला. या कामासाठी सप्टेंबर २०२३ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार होती, पण नागरिकांचा विरोध वाढल्याने हे काम थांबविण्यात आले.

Balbharati Paud Phata Link Road
Pune : येरवडा ते कात्रज बोगद्याची घोषणा झाली पण 'या' मार्गावरील बोगदा अद्याप कागदावरच

पर्यावरणप्रेमींचे आक्षेप

हा रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने येथील पर्यावरणाची हानी होणार असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक व संघटनांनी यास विरोध केला आहे. पाण्याचे झरे आटतील, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, पुण्यातील टेकड्या, जैवविविधता नष्ट केली जात आहे, असा आरोप करण्यात आला. तसेच, एका बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप केला गेला. या रस्त्याच्या विरोधात हजारो नागरिकांनी मोर्चाही काढला होता.

बालभारती पौडफाटा रस्त्याच्या विरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. आवश्‍यक त्या परवानग्या घेऊन रस्ता करण्याची परवानगी न्यायालयाने दिली. वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथविभाग

बालभारती पौडफाटा रस्ता प्रकल्पासाठी आवश्‍यक असणाऱ्या परवानग्या आम्ही घेणार आहोत. विकास आराखड्यात हरकती सूचना घेऊन याचा समावेश डीपीत केला होता, अशी भूमिका महापालिकेने न्यायालयात मांडली. ती बाजू योग्य वाटल्याने रस्ता करण्यास परवानगी दिली. याबाबत सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ही दाखल केले जाणार आहे.

- नीशा चव्हाण, विधी सल्लागार, पुणे महापालिका

काही राजकीय लोकांनी या रस्त्याच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावत रस्त्याचे काम करण्यास परवानगी दिली. शहरातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन या रस्त्याचे भूमिपूजन करावे.

- उज्ज्वल केसकर, माजी नगरसेवक

असा आहे रस्ता (सप्टेंबर २०२३ चा अंदाज)

- रस्त्याची एकूण लांबी - १.८ किलोमीटर

- यापैकी उन्नत मार्ग - ४०० मीटर

- रस्त्याची रुंदी - ३० मीटर

- अंदाजे खर्च २५२. १३ कोटी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com