
पुणे (Pune) : चाकण एमआयडीसीमध्ये सुरू असणारी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती ही रस्त्यांसाठी मलमपट्टी तर कामगार आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. टप्पा क्रमांक दोन मधील अंतर्गत रस्त्यांची अवघ्या काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात आले होते.परंतु अवघ्या सहा ते सात महिन्यात या रस्त्याची दुरूस्ती करावी लागत आहे. त्यामुळे त्यावेळी करण्यात आलेल्या या कामाचा दर्जा काय असेल ? असा प्रश्न निर्माण होत आहे.अशा कामांमधून केवळ ठेकेदार पोसले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन अंतर्गत येणाऱ्या वराळे,भांबोली परिसरात एप्रिल-मे महिन्यात एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी काम निकृष्ट होत असल्याचे प्रशासनच्या निदर्शनास आणून दिले होते.परंतु त्यावेळी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी आपण संबंधित ठेकेदाराला सांगून हे काम पुन्हा करून घेऊ असे आश्वासन दिले आणि वेळ मारून नेली.
परंतु आता पावसाच्या चार ते पाच महिन्यानंतर या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.दुरुस्त केलेले जवळपास सर्वच रस्ते उखडले आहेत. आता याच रस्त्यांची पुन्हा दुरुस्ती केली जात असून त्यासाठी मागील दहा ते बारा दिवसांपासून खडी आणि क्रशसँड रस्त्यावर टाकली आहे. परंतु रस्ता दुरुस्तीमुळे वाहनचालकांची सुटका होण्या ऐवजी त्यांची ससेहोलपट होत आहे. दुचाकी वाहने घसरत आहे तर मोठ्या वाहनाचे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढत आहे. खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्याने लहानमोठे अपघात घडत आहे. एकप्रकारे ही रस्ता दुरुस्ती वाहनचालकांसाठी मलमपट्टी ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे.
ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मुरले आहे त्या काही ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. परंतु संबंधित ठेकेदाराला सांगून तात्काळ रस्ता दुरुस्ती करून घेऊ.
- सतीश चौंडेकर (उपअभियंता,एमआयडीसी)