
पुणे (Pune) : पुणे बाजार समितीत ठेकेदारांकडून ‘वाहन प्रवेश शुल्का’च्या नावाखाली शेतकरी वाहनचालकांची लूट सुरू आहे. बाजारातून शेतमालाची रिकामी वाहने बाहेर पडत असताना प्रत्येक वाहनचालकाकडून दहा ते पन्नास रुपयापर्यंत शुल्क घेतले जात आहे. तसेच त्यांना कोणतीही पावती दिली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी बाजारात शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना वाहन प्रवेश शुल्क आकारले जात नाही. परंतु भुसार विभागातील गेट नं. ५ मधून बाहेर पडणाऱ्या मालाच्या वाहनांकडून पैसे आकारले जात आहेत. याकडे समिती दुर्लक्ष करीत आहे. संचालक मंडळ आल्यानंतरही शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. तसेच गुळ-भुसार बाजारात खरेदीसाठी येणार्या चारचाकी वाहनांना पार्किंग शुल्क आणि वाहन प्रवेश शुल्क, असे दोन प्रकारचे शुल्क आकारले जाते. बाजारात दररोज सुमारे हजार ते दीड हजार वाहने येतात. प्रतिवाहन दहा रुपयांप्रमाणे दहा ते पंधरा हजार रुपये जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे जमा होणारे पैसे नक्की कुठे जातात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भुसार बाजारात पहिल्या पाच तासांसाठी १० रुपये, त्यानंतर प्रतितास दहा रुपये, असे शुल्क निश्चित केले असताना बाजारात येणार्या वाहनांकडून प्रवेश शुल्काच्या नावाखाली तीस रुपयांपासून काही चालकांकडून अगदी दोनशे रुपये शुल्क घेतले जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका संचालकानेदेखील याबाबत संबंधितांना जाब विचारला होता. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
मुख्य प्रवेशद्वारातून शेतमालाची वाहने माघारी जाण्यासाठी गेट सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती पुणे