
पुणे (Pune) : ‘‘मुंबईजवळ नवी मुंबई, दिल्लीजवळ नवी दिल्ली उभी राहिली. मग पुण्याजवळ नवे पुणे का उभे राहिले नाही,’’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे शहराच्या हद्दवाढीवर प्रश्न उपस्थित केला. हे शहर अजून किती वाढू देणार. त्यामुळे आज या शहरात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे, असेही ते म्हणाले.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘राष्ट्र उभारणीमध्ये बांधकाम व्यवसाय आणि पायाभूत सोयीसुविधा यांचे महत्त्व’ या विषयावर गडकरी बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, उपाध्यक्ष आदित्य जावडेकर, कपिल गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
नाईकनवरे म्हणाले, “बांधकाम व्यवसाय हे एक गुंतागुंतीचे क्षेत्र असून, यात अनेक कायदे, कर आकारणी आणि मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आहे. मात्र असे असले तरी रेरा कायद्याने या उद्योगाचा कायापालट करून या क्षेत्रात आता पारदर्शकता, जबाबदारीची जाणीव, ग्राहककेंद्रित आणि आर्थिक शिस्त आली आहे. बांधकाम व्यवसाय क्षेत्र २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्यास आता सज्ज झाले आहे. या क्षेत्रातून ६ टक्के इतका येणारा जीडीपी हा १४ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.’’
पुण्यातील पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित घडामोडींची माहिती पाटील यांनी दिली. इराणी यांनी बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या गडकरी यांच्यापुढे मांडत त्याविषयी मदत करण्याची विनंती केली. कपिल गांधी यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य जावडेकर यांनी आभार मानले.
स्मार्ट व्हिलेज उभारावीत
- एकेकाळी हे शहर उत्तम होते. आजही प्रत्येक जण पुणे शहरातच राहण्यासाठी उत्सुक
- पुणे शहराच्या आजूबाजूच्या विकासासाठी ५५ हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित
- शहराच्या चारही बाजूंना दुमजली आणि तीनमजली उड्डाण पुलांचे नियोजन
- पुणे-बंगळुर, पुणे-छत्रपती संभाजीनगर यासारखे नवीन रस्ते हाती घेणार
- या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना विकसनासाठी मोठी बिगर शेत जमिनी उपलब्ध होणार
- तिकडे बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष द्यावे. स्मार्ट शहराप्रमाणे स्मार्ट व्हिलेज उभारावीत.
- नवे पुणे उभारण्यासाठी प्रयत्न करावा.
- बांधकाम व्यावसायिकांनी खर्च कमी करण्यासाठी नवसंकल्पनांचा अंतर्भाव करावा.
- नवीन तंत्रज्ञान व बांधकाम सामग्रीत पर्यायी पदार्थांचा (मटेरियल) वापर करण्यावर भर द्यावा.