
पुणे (Pune) : गेल्या एक ते दीड महिन्यांपासून चिंचवड स्टेशन ते चिंचवड गाव रस्त्यावरील पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवला आहे. परंतु प्रत्यक्षात अजून काम सुरूच झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यातच शुक्रवारी (ता.१८) अचानक कोणीतरी बॅरिकेडस काढून पुलावरून वाहतूक चालू केल्याचा प्रकार घडला. मात्र त्याबाबत महापालिका बीआरटीएस विभाग आणि वाहतूक पोलिसांनी कानावर हात ठेवले आहेत.
चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव पूलावर पूर्वीपासूनच मोठी वाहतूक असते. सध्या दुरुस्तीकामासाठी एक बाजू दोन्ही दिशांकडून येणाऱ्या वाहनांसाठी खुली आहे. त्यामुळे, संपूर्ण वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडून जात आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी विशेषतः कार्यालयीन वेळा आणि शाळा/महाविद्यालये सुटण्याच्या वेळेस येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, कामावर जाणारे कर्मचारी यांना अक्षरशः तास न् तास वाहतुकीमध्ये अडकून बसावे लागते. त्यामुळे याचाच परिणाम की काय म्हणून अज्ञात वाहनचालकांनी बॅरिकेडस् काढून स्वतः वाहतूक चालू केली. वाहतूक विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.
पर्यायी मार्गावरही कोंडी
चिंचवड स्टेशन, लोकमान्य हॉस्पिटल, रामकृष्ण मोरे नाट्यगृह अशा महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणे आता वेळखाऊ व त्रासदायक झाले आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही बाब फारच अडचणीत आणणारी ठरत आहे. आकुर्डी मार्गे जय गणेश व्हिजन समोरील दळवीनगर उड्डाणपूल तसेच पिंपरी मार्गे उड्डाणपुलाजवळून चिंचवडकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरही वाहतुकीचा जबरदस्त ताण आहे. सायंकाळी या रस्त्यांवर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसतात.
हा पूल अजून वाहतुकीस खुला केलेला नाही. खुला झाला असेल; तर लगेच बंद केला जाईल. कोणाच्या अंगावर प्लास्टर पडू नये म्हणून कंत्राटदाराला सांगून ताडपत्री बांधण्याचे काम सुरू केले आहे. आठवडाभरापूर्वी रेल्वेने पत्राद्वारे पुलाच्या दुरुस्ती कामास मान्यता दिली आहे. त्यामुळे आठवड्याभरात निविदा काढून आयुक्तांची परवानगी घेऊन आम्ही दुरुस्ती काम चालू केले जाईल. त्यानंतर तीन आठवडे काम करण्यास लागतील. त्यानंतर रेल्वेला केलेले काम दाखवून मग हलक्या वाहनासाठी पूल सुरू केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी दुसऱ्या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. एम्पायर इस्टेटच्या लूपचे काम झाले आहे. हा रस्ता लवकरच सुरू होईल.
- प्रेरणा शिनकर, कार्यकारी अभियंता (बीआरटीएस)
महापालिकेच्या सांगण्यावरून वाहतूक बंद केलेली नाही. प्लास्टर पडले म्हणून बंद केली आहे. मी वाहतूक विभागाला तसे कळवले होते की लवकर काम करा किंवा पूल तरी वाहतुकीस सुरू करा. सध्या चिंचवडकडे जाण्यासाठी प्रोव्हायडर म्हणून एम्पायर इस्टेटच्या नदीवरील पुलाचे दोन्ही लूपचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच १ मेला उद्घाटन देखील करण्याची तयारी चालू आहे. त्याने चिंचवडला जाता येईल. त्यानंतर हा पूल पाडण्यात येईल.
- बापूसाहेब गायकवाड, प्रकल्प अधिकारी, बीआरटीएस
वाहतूक विभागाकडून पूल चालू केला गेला नाही. मी स्वतः पाहिले पूल कोणीतरी रिक्षाचालकांनी चालू केला. कारण वाहतुकीवर प्रचंड ताण येत असतो. गर्दीच खूप होत आहे. महापालिकेचे अधिकारी येऊन पाहून गेले. परंतु प्रत्यक्षात काम सुरू नाही. लवकरच काम सुरू होईल असे म्हणाले. परंतु अजून कुठल्याच कामाला सुरुवात नाही. आम्ही वाहतूक कोंडी होत असल्याबद्दल महापालिकेला स्मरणपत्रासह दोन पत्रे पाठवले आहेत.
- शंकर डामसे, वाहतूक पोलिस निरीक्षक, चिंचवड
नागरिकांच्या मागण्या...
- हलक्या वाहनांसाठी पूल सुस्थितीत असेल; तर हलक्या वाहनांसाठी ताबडतोब सुरू करावा.
- चिंचवडकडे जाणाऱ्या पर्यायी लूपचे काम होऊन रस्ते चालू होणार असतील; तर या पुलासाठी कशाला खर्च ?
- पुलाचे काम करायचे असेल; तर लवकर आणि वेळेत पूर्ण केले जावे
- सध्या वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस कायम ठेवावेत
- अतिआवश्यक वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग किंवा गतीशील सेवा द्यावी