
भोसरी (Bhosari) : कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाकडे पिंपरी चिंचवड महापालिकेने दुर्लक्ष केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खुर्च्या, डास, पिसवांसारखे किटक, गळकी पाण्याची टाकी, फाटका गालिचा, घुशी-उंदराने पोखरलेला मंच आदी गैरसोयींबद्दल श्रोत्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने मंचाचा पडदा सतत उघडाच ठेवण्याची वेळ नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांवर आली आहे.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कंपन्यांसह परिसरातील शाळांचे विविध कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. मात्र, या नाट्यगृहाकडे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने दुर्लक्ष केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे.
नाट्यगृहातील खुर्च्या मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहेत. रंगमंच आणि विंगेत घूस आणि उंदरांनी बिळे तयार केली आहेत. रंगमंचाची रंगरंगोटीही नाहिशी झाल्याने विद्रूपीकरण झाले आहे. कार्यक्रमासाठी फाटलेले पडदे नाट्यगृह कर्मचाऱ्यांना शिवावे लागले आहेत.
काय आहेत समस्या?
- ग्रीन रुममधील फर्निचरसह स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले
- छतावरील दोन पाण्याच्या टाक्यांपैकी एक टाकी गळकी, हे पाणी ग्रीनरुम समोर
- नाट्यगृहाच्या बाहेरील स्वच्छतागृह आणि सांडपाण्याच्या गळतीने भिंती विद्रूप
- ग्रीन रुमजवळील प्रवेशद्वारावरील लोखंडी पत्रे उचकटलेले
- छताच्या पीओपीचे तुकडे खाली पडत आहेत
- नाट्यगृहातील जमिनीवरील गालिचा जागोजागी फाटला
- पाठीमागील वाहनतळाच्या जागेत दलदल
अभिनेते प्रसाद ओक यांनाही मनस्ताप
पाच महिन्यांपूर्वी नाट्यगृहात एका शाळेचा कार्यक्रम सुरू असताना रंगमंचावर पडद्याचा लोखंडी रॉड पडला. मात्र, त्यावेळी रंगमंचावर रॉडच्या खालील भागात कोणी उपस्थित नसल्याने मोठी हानी टळली. कार्यक्रमापूर्वी तयारीसाठी नाट्यगृहाचा पडदा बंद केला जातो. तर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पडदा उघडला जातो. मात्र, पडदा बंद - उघडण्याच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने पडदा सतत उघडाच ठेवावा लागत आहे. गेल्या आठवड्यात सिनेअभिनेते प्रसाद ओक चित्रीकरणासाठी नाट्यगृहात आले होते. त्यांना पडदा बंद करून उघडायचा होता. मात्र, पडदा बंद झालाच नसल्याची माहिती नाट्यगृहातील एका कर्मचाऱ्याने दिली.
नाट्यगृहाच्या उत्पन्नात घट
नाट्यगृहाने २०२३ - २४ या आर्थिक वर्षात एक कोटी बारा लाख ६८ हजार २९६ रुपयांचे उत्पन्न घेतले. मात्र, नाट्यगृहाच्या दुरवस्थेमुळे २०२४ - २५ या आर्थिक वर्षात नाट्यगृहातील कार्यक्रमांची संख्या घटली. त्यामुळे या आर्थिक वर्षांत नाट्यगृहाला अवघे ७१ लाख ३५ हजार ५०५ रुपयांवर समाधान मानावे लागले.
व्हीआयपी रुम नावालाच
नाट्यगृहातील व्हीआयपी रुममधील कुशनच्या खुर्च्यांचे पाय तुटल्याने त्यांच्या खाली सिमेंटचे पेव्हिंग ब्लॉक ठेवण्यात आले आहेत. या रुमसह ग्रीनरुमधील खिडक्यांचे पडदे तुटल्याने कार्यक्रमासाठी कपडे बदलताना नाट्यकर्मींची गैरसोय होत आहे. व्हीआयपीमधील खिडकी पेपरने झाकली आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे नाट्यगृहातील विविध कामांच्या दुरुस्त्यांबद्दल २०१६ पासून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाने नाट्यगृहातील त्रुट्या दूर करणे गरजेचे आहे.
- सोमनाथ जाधव, व्यवस्थापक, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी
नाट्यगृहातील किरकोळ कामे महापालिकेच्या स्थापत्य विभागाद्वारे करण्यात येतात. मात्र नाट्यगृहातील काही विशिष्ट तांत्रिक बाबींविषयीची कामे करता येत नाहीत. त्यासाठी त्या कामातील तज्ज्ञांची बाहेरुन मदत घ्यावी लागते. नाट्यगृहाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- शैलेंद्र चव्हाण, उपअभियंता, स्थापत्य विभाग, ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालय
नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा बंद झाल्यावर पिसवांसारखे कीटक चावतात. त्याचप्रमाणे डासांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कार्यक्रमावेळी नाट्यगृहात उपहारगृहाची सोय नसल्याने अडचण होते.
- एक श्रोता, भोसरी