

मुंबई (Mumbai): महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीद्वारे शालेय पाठ्यपुस्तके छापण्यासाठी वापरण्यात येणारा कागद हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. त्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली, परंतु याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.
सध्या याचिकेवर कोणत्याही तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही, उच्च न्यायालय पुन्हा नियमितपणे सुरू होईपर्यंत सेवाभावी संस्थेने जनहित याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आणि सूचनांवर प्रतिवाद्यांनी विचार करावा, असे सुट्टीकालीन न्यायालयाचे न्या. अद्वैत. एम. सेठना यांच्या एकलपीठाने आदेशात स्पष्ट केले.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संकल्प जीवन या सेवाभावी संस्थेने जनहित याचिका केली आहे. महाराष्ट्र राज्य मंडळासाठी पाठ्यपुस्तकांच्या छपाई आणि प्रकाशनासाठी खरेदी आणि वापरल्या जाणाऱ्या कागदाच्या गुणवत्तेच्या किमान मानकात लक्षणीय घट आणि अवमान करण्याच्या बालभारतीच्या कृतीला याचिकेतून आव्हान दिले आहे.
या टेंडर अटींमध्ये पेपरचा दर्जा, अनुभव आणि इतर महत्त्वाच्या पात्रता निकषांमध्ये अचानक बदल केल्याने बालभारतीचा काही विशिष्ट बोलीदारांना पसंती देण्याचा हेतू दिसून येत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे.