

पुणे (Pune): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक अशी ओळख असलेल्या आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, या परिसरातील वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळविण्यासाठी पुणेकरांना अजून किमान दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
औंध ते शिवाजीनगर दिशेचा पुलाचा भाग २० ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र बाणेर आणि पाषाणकडील दोन्ही बाजूंची कामे अद्याप सुरू असून, पीएमआरडीएच्या नियोजनानुसार बाणेरकडील मार्ग नोव्हेंबरअखेर, तर पाषाणकडील मार्ग डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या उड्डाणपुलाचे बांधकाम माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा (PMRDA Metro Line 3) महत्त्वाचा भाग आहे. दुमजली रचनेत पहिल्या स्तरावर वाहतूक मार्गिका तर वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका असेल. या प्रकल्पामुळे औंध, बाणेर, पाषाण आणि विद्यापीठ परिसरातील वाहतूक प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरळीत होणार आहे.
सध्या शिवाजीनगरहून औंध, बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या वाहनचालकांना सकाळ-संध्याकाळ तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोॉ. मात्र दुसरी बाजू पूर्ण झाल्यानंतर आणि बाणेर रॅम्प सुरू झाल्यावर या ठिकाणच्या वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पाच्या आराखड्यात अलीकडेच सुधारणा करण्यात आली असून, सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक या उड्डाणपुलाला जोडण्यासाठी दोन रॅम्प मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीचे नियोजन अधिक परिणामकारक होणार आहे.
पुलाच्या लांबीमध्ये सुमारे ३०० मीटरने कपात करण्यात आली असून, यामुळे प्रकल्पाचा वेग आणि कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. डॉ. म्हसे म्हणाले, “औंध-शिवाजीनगर मार्गिका सुरू झाल्यानंतर आता उर्वरित दोन्ही बाजूंची कामे झपाट्याने सुरू आहेत. डिसेंबरअखेर संपूर्ण दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”