महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करणार! काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

महाराष्ट्रात ‘स्टेट मॅन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू; प्रगत उत्पादन क्षेत्रात देशाचे नेतृत्व करण्याचा फडणवीसांचा निर्धार
Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : केंद्र सरकारच्या ‘नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन’च्या धर्तीवर महाराष्ट्र शासन ‘राज्य उत्पादन अभियान’ (State Manufacturing Mission) सुरू करणार असून, या माध्यमातून प्रगत उत्पादन क्षेत्रात (Advanced Manufacturing) देशाचे नेतृत्व करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याचबरोबर राज्यात जागतिक दर्जाची ‘ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ स्थापन केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
मोदींच्या 'या' योजनेमुळे राज्य सरकारचे वाचणार कोट्यवधी रुपये!

निती आयोग आणि ‘यशदा’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित ‘द रोड टू इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, आणि सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राने ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ व्हिजन तयार केले आहे. या व्हिजनचा मुख्य घटक म्हणजे उत्पादन क्षेत्रातील परिवर्तन. एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टर ही तीन क्षेत्रे आज जगातील स्पर्धेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महाराष्ट्र ‘ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे जागतिक हब बनवेल.”

Devendra Fadnavis
भंडारा ते गडचिरोली सुसाट! नव्या एक्सप्रेस-वेमुळे 23 किमीची बचत

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, पुणे आणि मुंबईदरम्यान ‘क्वांटम कॉरिडॉर’ आणि ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. नवी मुंबईला ‘डेटा सेंटर सिटी’ म्हणून विकसित करण्यात येणार असून, पुण्यात फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट तसेच ‘एज्यु-सिटी’ उभारली जाईल. या एज्यु-सिटीमध्ये १२ आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार असून त्यापैकी सात विद्यापीठे आधीच सहभागी झाली आहेत.

निती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रमण्यम म्हणाले की, “कोणताही देश उत्पादन क्षेत्राशिवाय विकसित होऊ शकत नाही. महाराष्ट्र सध्या जीएसडीपी, उत्पादन आणि थेट परदेशी गुंतवणुकीत देशात अग्रस्थानी आहे, परंतु हे स्थान कायम राखण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग आणि गुंतवणूक आवश्यक आहे.”

सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी संशोधन व विकास (R&D) क्षेत्रात गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. “यामुळे उत्पादनक्षमता २० ते ३० टक्क्यांनी वाढू शकते. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या समन्वयातून महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग हब अधिक सक्षम होईल,” असे त्यांनी नमूद केले.

या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com