
सोलापूर (Solapur) : समांतर जलवाहिनीचे उजनी धरण ते सोलापूर-पुणे महामार्गादरम्यान रांजणी येथील १ हजार ४०० मीटरपैकी १ हजार १०० मीटरचे काम पूर्ण झाले तर ३०० मीटरचे काम सुरू आहे. तसेच मोडनिंब येथील ४० मीटरचे कामही सोमवारी हाती घेण्यात आले. ११० किलोमीटरपैकी आता केवळ ३४० मीटरचे काम शिल्लक आहे. २८ एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होईल, त्यानंतर चाचणीचे काम हाती घेण्यात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे व्यंकटेश चौबे यांनी दिली.
सहा महिन्यांपासून रखडलेले समांतर जलवाहिनीचे ३ हजार २०० मीटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकतेच अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी, पाण्याचा साठा कमी होत आहे, शहर पाणीपुरवठ्याचे नियोजन करा, त्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेने मक्तेदाराला ३० एप्रिलपर्यंतच मुदत दिली आहे. त्यापूर्वी हे काम होऊन चाचणी करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि टेंभुर्णी पोलिसांचे पथक यांच्या संयुक्त विद्यमाने उजनी धरण ते महामार्गालगत असलेल्या रांजणी येथील १ हजार ४०० मीटरपैकी १ हजार १०० मीटरचे काम २० दिवसांमध्ये पूर्ण केले. आता ३०० मीटरचे काम राहिले आहे.
मोडनिंब येथे ४० मीटरचे काम रखडले होते, ते सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. आठवड्याभरात ३४० मीटरचे काम पूर्ण होईल. त्यानंतर जलवाहिनीची चाचणी तत्काळ सुरुवात करण्यात येणार असल्याचेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.