
सोलापूर (Solapur) : छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन मार्गावरील बाधित होणाऱ्या मिळकतींचे भूसंपादन व निवाडे जवळपास पूर्ण झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील या प्रकल्पात १३७ बाधित मिळकतींपैकी १०० खासगी तर ३७ शासकीय व निमशासकीय मिळकती आहेत. पहिल्या टप्प्यातील १०० खासगी मिळकतींपैकी ९२ मिळकतींच्या निवाड्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी ५९ मिळकतींचा ताबादेखील घेण्यात आला आहे.
शासकीय व निमशासकीय मिळकतींचे भूसंपादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखालील विशेष भू-संपादन अधिकारी करणार आहेत. पाच टप्प्यापैकी एक टप्प्याचे भूसंपादनाचे काम प्रलंबित असून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. ज्यांनी नुकसान भरपाई घेतली नाही, त्यांची रक्कम लवादाकडे जमा करण्यात येत आहे.
जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पात ९६ मिळकती बाधित होणार आहेत. यापैकी खासगी ८४ तर १२ शासकीय- निमशासकीय आहेत. या प्रकल्पाच्या रचनेत बदल झाल्याने त्याबाबतचे शुद्धीपत्रक मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे. त्यालाही मंजुरी मिळाल्याने लवकरच दुसऱ्या टप्प्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ३७ तर दुसऱ्या टप्प्यात १२ अशा एकूण ४९ शासकीय- निमशासकीय जागा आहेत. भूसंपादनानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून उड्डाणपूल बांधण्याचे टेंडर काढण्यात येणार आहे.
दोन उड्डाणपूल बांधण्याची योजना २०१६ मध्ये जाहीर केली होती. त्यानंतर सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पातील खासगी मिळकतींपैकी आठ मिळकतींच्या निवाड्यांचे काम बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी प्रस्ताव प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्ण झाल्यावर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
१०६ कोटी रुपये अपेक्षित
शासकीय जागांसंदर्भात आयुक्त ओम्बासे यांच्या पाठपुराव्यामुळे भूसंपादनातील खर्च कमी झाला आहे. १४४ कोटी एकूण भूसंपादनासाठी निधी अपेक्षित होता. शासकीय जमिनीचा विषय मार्गी लागल्याने आता १०६ कोटी रुपये भूसंपादनासाठी अपेक्षित आहेत.
पाचपैकी एका टप्प्यातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. फेज वन उड्डाणपुलासाठी ७० कोटी तर फेज टूच्या उड्डाणपुलासाठी ३५ कोटी रुपये, असा एकूण १०६ कोटी रुपये भूसंपादनासाठी निधी अपेक्षित आहे.
- डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त महापालिका