.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर (Solapur) : सोलापुरातील होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा विषय आता सोलापूरकरांच्या थट्टेचा झाला आहे.
सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी पूर्वी ४२ आसनी विमानसेवेचा परवाना मिळाला होता. आता सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा ७२ आसनी विमानाद्वारे दिली जाणार आहे. त्यासाठी नव्याने परवाना घ्यावा लागणार आहे. डिसेंबरपासून प्रलंबित असणारा हा विषय मार्गी लागल्यानंतर आणखी दोन महिने प्रत्यक्ष विमानसेवेसाठी थांबावे लागणार आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) ११ व १२ सप्टेंबर रोजी विमानतळाची पाहणी व तपासणी केली होती. त्यानंतर २५ सप्टेंबरला विमानसेवेचा परवाना मिळाला आणि २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होटगी रोड विमानतळाचे उद्घाटन दुरदृश्य प्रणालीद्वारे झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास पाच महिन्यांपासून सोलापूरच्या विमानसेवेबाबत फक्त गप्पाच मारल्या जात आहेत.
सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने टेंडर प्रक्रिया राबविली आहे. ही प्रक्रिया राबविताना सोलापूर ते मुंबईसाठी ७२ आसनी विमानसेवेचा उल्लेख करण्यात आला आहे. सोलापुरातील होटगी रोडवरील विमानतळाला ४२ आसनी विमानसेवेचा परवाना मिळालेला असताना टेंडर काढण्यात आल्याने आता ७२ आसनी विमानसेवेच्या परवान्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जात आहेत.
सोलापूर ते मुंबई दरम्यान ७२ आसनी विमानाद्वारे विमानसेवा सुरू करण्यासाठी ३१ जानेवारी रोजी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. या प्रक्रियेत किती विमान कंपन्यांनी सहभाग घेतला?, याची ठोस माहिती ना जिल्हा प्रशासनाकडे आहे, ना होटगी रोड विमानतळ कंपनीकडे आहे.
सोलापूरच्या विमानसेवेबाबत फक्त रोज नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात विमानसेवा मात्र अद्यापही सोलापूरकरांच्या नशिबी आलेली नाही.
नाईट लॅण्डिंगचा आढावा
सोलापुरातून दिवसाची विमानसेवा सुरू होण्याचा विषय प्रलंबित असताना राज्याच्या मुख्य सचिवांनी नाईट लॅण्डिंग सेवा सुरू करण्यासाठीचा आढावा घेतला. होटगीरोड विमानतळ परिसरातील विमानतळाच्या जागेवरील सहा गटांमध्ये अतिक्रमण आहे. या ठिकाणी पत्र्याचे २६० शेड आहेत तर २६३ पक्के बांधकाम असलेली घरे आहेत. नाईट लॅण्डिंगसाठी जवळपास ५२३ अतिक्रमणांचा अडथळा आहे.
या सर्व अतिक्रमण धारकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन ही घर पाडण्यासाठी स्थगिती मिळविलेली आहे. होटगीरोड विमानतळावरून नाईट लॅण्डिंग सुरू करण्यासाठी मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.
पूर्वी ४२ आसनी विमानसेवेसाठी परवानगी मिळाली आहे. हा परवाना ७२ आसनी विमानसेवेसाठी मिळावा (रि-सर्टिफिकेशन) यासाठी भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या सोलापूर कार्यालयाने सर्व कागदपत्र डिसेंबरमध्येच सादर केली आहेत. हा परवाना लवकरात लवकर मिळावा यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर