
सातारा (Satara) : दर्जाच्या मुद्द्यावर पॅरेंट स्कूल ते रामराव पवार नगर येथील गटाराचे काम कुणाल तात्यासाहेब गायकवाड यांच्याकडून काढून घेत त्यांना इतर टेंडर प्रक्रियेत सहभागास बंदी घातली होती. याच कुणाल गायकवाड यांनी ठेक्यासाठी खोटे करारनामे जोडल्याची तक्रार झाल्यानंतर त्याबाबत म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी ते सादर केले नाही. यामुळे त्यांच्या कामांची अनामत जप्त करत पुढील टेंडर प्रक्रियेत सहभागास बंदी घातल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून रामराव पवार नगर परिसरातील सुमारे एक कोटी ३८ लाखांचे काम पालिकेने प्रस्तावित केले होते. कमी दराचे टेंडर सादर करणाऱ्या कुणाल गायकवाड यांना हे काम देण्यात आले. कामात अनियमितता असल्याचे कमी दर्जाचे लोखंड तसेच त्यात जास्तीची जागा सोडल्याचे पाहणीत आढळले होते. याबाबत सूचना करूनही कामात सुधारणा न झाल्याने कार्यादेश रद्द करत १६ लाख ७५ हजारांची अनामत रक्कम पालिकेने जप्त करत कुणाल गायकवाड यांना पुढील टेंडर प्रक्रियेत सहभागासाठीची बंदी घालण्यात आली आहे.
याच गायकवाड यांनी एका निविदेसोबत यंत्रणेची खोटी कागदपत्रे, करारनामे जोडल्याची तक्रार रोहित प्रकाश जाधव यांनी केली होती. याबाबत म्हणणे सादर करण्यास सांगूनही गायकवाड यांनी ते सादर केले नाही. गायकवाड यांनी पालिकेची फसवणूक केल्याचे गृहीत धरत सहभाग बंदीसह सर्व टेंडर रद्द करत त्याच्या बयाणा रक्कम जप्त केल्याची माहिती अभिजित बापट यांनी दिली आहे. याच पत्रकात त्यांनी सर्व कामांची तसेच साहित्याची चाचणी, तपासणी त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.