
सातारा (Satara) : येथील पालिकेच्या प्रशासनातील त्रुटी, चुकांचा फायदा घेण्याचा सपाटाच काही जणांनी लावल्याचे समोर येत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी कामाच्या अनुषंगाने दिलेल्या पत्रात फेरफार करत त्या आधारे ठेक्याला मुदतवाढ दिल्याचा एकाने बनाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रात फेरफार केल्याची माहिती मिळूनही त्याविरोधात पालिका प्रशासन कायदेशीर प्रक्रिया करण्याचे धाडस दाखवत नसल्याने शहरवासीय आश्चर्य व्यक्त करत आहेत.
येथील पालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या अनेक विभागांतील कामांचे ठेके वेळोवेळी प्रशासनाच्या वतीने तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ठेकेदारांना देण्यात येतात. अशाच पद्धतीने सोनगाव कचरा डेपोत उभारलेल्या एका प्रकल्पाचे व्यवस्थापन व नियंत्रण एका संस्थेस देण्यात आले होते. या प्रकल्पाचे व्यवस्थापन, नियंत्रणाच्या ठेक्याची मुदत काही महिन्यांपूर्वी संपल्याची माहिती आहे.
मुदत संपल्यानंतरही तो ठेका आपल्यात ताब्यात ठेवण्याची धडपड नंतरच्या काळात संबंधित संस्थेच्या व्यक्तीने सुरू केली. यासाठी त्याने विविध हातखंडे वापरत काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली. कोणत्याही प्रकारे त्या प्रकल्पाचे व्यवस्थापन, संचलन, नियंत्रण आपल्याकडेच राहावे, यासाठी नंतर त्याने बनावटगिरी केली. यापूर्वीच्या एका कामासाठी पालिकेतील सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या एका पत्रात त्याने फेरफार करत ठेक्याला मुदतवाढ दिल्याचे त्यात नमूद केले. या पत्राआधारे त्याने मुदत संपलेल्या ठेक्याचे काम, तसेच पुढे रेटण्यास सुरुवात केली.
या पत्राबाबत नंतर मोठा गवगवा झाला. त्याची प्रत पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या हाती पडली. यानंतर त्यांनी पत्राबाबत शहानिशा केली असता, सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्याने ठेक्यास मुदतवाढ देण्याबाबतचा कोणतीही ना - हरकत असल्याचे पत्र दिले नसल्याचे समोर आले. गेल्या काही दिवसांपासून याबाबतची चर्चा पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांत सुरू आहे. चर्चा सुरू असलीतरी त्या पत्राच्या अनुषंगाने, तसेच त्यासाठी बनावटगिरी करणाऱ्यावर पालिका प्रशासनाने अद्याप कायदेशीर कारवाई का केली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.